राजकीय

नांदेडमध्ये महायुतीचे आघाडीचे अमरनाथ राजूरकर यांनी साधली विजयाची हॅट्रिक..!

कृष्णा पाटील आष्टीकर यांचा दणदणीत पराभव, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीचीही मते फुटली, निकालानंतर काँग्रेसने काढलेल्या व्हीपची चर्चा सुरू

नांदेड – नांदेड विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. राजूरकर यांनी विधान परिषद निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधली आहे असे करणारे ते जिल्ह्यातील पहिलेच राजकारणी ठरले आहेत. राजूरकर यांचा हा विजय अपेक्षित असला तरीही आता काँग्रेससह वंचित बहुजन आघाडी आणि इतर कोणकोणत्या पक्षाची मते भाजपाला मिळाली याची चर्चा नांदेडमध्ये सुरू झाली आहे. राजुरकर यांना या निवडणुकीत ३३९ मते मिळाली आहेत तर महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या कृष्णा आष्टीकर यांना ८४ मते प्राप्त झाले.वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांना केवळ पाच मते मिळाली आहेत.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या चिरंजीवाला काँग्रेसने आपला स्वतःचा उमेदवार मागे घेऊन पुरस्कृत केले होते. मतदानाच्या एक दिवस आधी खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना शिंदे गटाच्या तंबूत पोहोचलेले असतानाही काँग्रेसचे नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी व्हीप काढून कृष्णा पाटील आष्टीकर यांनाच मतदान करण्याचे मतदारांना बजावले होते. त्यामुळे त्यांची ही भूमिका वादात सापडली होती. काँग्रेसचे माघार घेतलेले उमेदवार रामदास सुमठाणकर यांनीही या भूमिकेबद्दल समाजमाध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेसच्या अनेक मतदारांनी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेचा लाभ महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना झाला. महायुतीसह महाविकास आघाडीचेही अनेक मते त्यांच्या पारड्यात पडली. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटातून शिंदे गटाच्या वाटेवर गेले असतानाच महाविकास आघाडीच्या अनेक मतदारांनी महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्याकडे संपर्क साधला होता. या संपर्क अभियानानंतर राजुरकर यांचा एकतर्फी आणि दणदणीत विजय होईल याचा अंदाज सर्वांनाच आला. अशाही परिस्थितीतही काँग्रेसने व्हीप काढून फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या चिरंजीवाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. या व्हीपच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांनी नेमके काय साधले असा प्रश्न पुढे आला आहे.

नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीतील घडामोडीनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसने आपल्याशी धोका केला असा संदेश दिला. अमरावती आणि नांदेडमध्ये काँग्रेसच्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी, असेही आवाहन केले होते. याच विषयावरून लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला मतदान केले नसल्याचे जाहीर केले; मात्र प्रत्यक्षात नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचीही तीन मते फुटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे मतदान महायुतीलाच गेल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. विशेष म्हणजे विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या निकालाचा कोणताही परिणाम काँग्रेसवर दिसून आला नाही. ना खेद ना आनंद अशीच परिस्थिती नांदेडमध्ये होती. काँग्रेसचे खासदार पक्षाच्या नांदेडमधील कार्यालयात मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनात ते व्यस्त दिसून आले.

विजयापेक्षा १०..२० मते अधिक असल्याचा केला होता दावा…महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेले उमेदवार कृष्णा पाटील अष्टीकर हे पहिल्या दिवसापासूनच अतिआत्मविश्वास बाळगून होते. आपल्याकडे विजयाचे गणित असल्याचे त्यांनी पहिल्या दिवसापासून सांगण्यास प्रारंभ केला इतकेच नव्हे तर विजयापेक्षा १०..२० मते अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले होते. हीच बाब त्यांनी वारंवार स्पष्ट केली होती. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही विजयाच्या गणिताबाबत विचारले असता आपण काहीही करणार नाही; मात्र विजय आपलाच असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात आष्टीकरयांनी पहिल्याच दिवशी सांगितल्याप्रमाणे काहीही केले नाही आणि महायुतीचा उमेदवाराला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे नांदेडमधील विधानपरिषदेची निवडणूक ही काँग्रेसच्या मदतीने फिक्स करण्यात आली असल्याचा संदेश गेला आणि तो संदेश निकालानंतर स्पष्टही झाला आहे. विजयापेक्षा १०…२० मते अधिक असल्याचा दावा महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील यांनी केला होता. ते सर्व मतदान आणि खुद्द उमेदवार कृष्णा पाटील हेही आता नेमके कुठे गेले हे आता सगळ्यांनाच कळून चुकले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!