
नांदेड – राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदारांना उडवून देण्याचा कट रचल्याची भीती दाखवून नांदेडच्या एका व्यापाऱ्याकडे एक लाख रुपये खंडणी मागणाऱ्यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मुंबईतून जेरबंद केले आहे. त्याच्याविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत. त्याचवेळी ते चार आमदार कोण हा प्रश्नही आता पुढे आला आहे.
एकीकडे राज्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मृत्यूचे गूढ उकलले नसताना, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना नांदेडची ही खळबळजनक आणि चिंताजनक बातमी पुढे आली आहे. नांदेड शहरातील महेश कृष्णाजी तुतारे आणि रवी रोकडे यांची जुनी ओळख होती. रोकडे हा सुतारे यांना गेल्या काही दिवसापासून फोन करून पैशाची मागणी करत होता. पैसे न दिल्यास तो धमकीही देत होता. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी महेश सुतारे हे घरी असताना त्यांना रोकडे याने मोबाईलवर संपर्क साधला आणि एक लाख रुपयांची मागणी केली. तुतारे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर रोकडेने संतापून धमकी दिली की मी तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि नांदेडच्या चार आमदारांना एकाच दिवशी उडविण्याचा प्लॅन केला होता. माझ्या पाठीशी मोठ्या लोकांचे हात आहेत. संपूर्ण नांदेड जिल्हा माझे काहीच बिघडू शकत नाही. एक लाख रुपये दिले नाहीत तर आयुष्यभर मला लक्षात ठेव अशी गंभीर धमकी दिली. या धमकीनंतर महेश तुतारे यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांचे पथक आरोपीच्या शिधासाठी विविध ठिकाणी रवाना झाले. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारित तपास केला असता संशयित आरोपी रवी रोकडे हा मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने नांदेड पोलिसांनी पेडर रोड येथील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातून रवी उर्फ रवींद्र गौतम रोकडे (वय ३९, व्यवसाय दिग्दर्शक रा. आष्टा, ता. आष्टी, जिल्हा बीड सध्या ह. मु. कॅन्सर हॉस्पिटलमागे, सिडको) याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी रवी रोकडे याला वजीराबाद पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी रवी रोकडे याला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, सुधाकर देवकते तसेच सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे यांनी ही कारवाई पार पाडली.
आरोपी रवी रोकडे याने नेमक्या कोणत्या हेतूने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि आणि नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांच्या नावाचा संदर्भ देऊन कट रचल्याची धमकी दिली, यामागे त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का आणि इतर नेत्यांबाबत त्याचा काही घातपाताचा बेत आहे का याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला नांदेड येथे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे उभे केले. न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील पोलीस तपास सहायक पोलीस निरीक्षक सी. व्ही. बोयणे हे करत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेडचे चार आमदार थेट उडविण्याचा कट रचण्यात आलेले ते चार आमदार कोणते? असा प्रश्नही आता पुढे आला आहे. पोलीस या अनुषंगाने सखोल तपास करीत आहेत.