क्राईम

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन हायवा जप्त, सोनखेड पोलिसांची कारवाई

वेगवेगळ्या ठिकाणी तीन कारवाया, १५ ब्रास रेतीसह १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नांदेड – जिल्ह्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मैदानात उतरल्यानंतरही जिल्ह्यात अवैध वाळू उपसा थांबला नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात लोहा तालुक्यातील सोनखेड येथे वेगवेगळ्या तीन कारवाईत पोलिसांनी तीन हायवांसह १५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी २० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पाच जणांविरुद्ध सोनखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोदावरी नदीच्या पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी किंवा रॉयल्टी न घेता अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोनखेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत सोनखेड कलंबर फाटा ते दापशेड रस्त्यावर एमएच २६ सीव्ही ४२८५ क्रमांकाचा हायवा ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमध्ये पाच ब्रास रेती आढळली. या प्रकरणात ओमकार प्रकाशराव भुजबळ रा. शेलगाव ता. लोहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील हायवा ट्रक मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत सोनखेडचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे पथक सोनखेड ओव्हरब्रिजवर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एमएच सीटी १४५० क्रमांकाच्या हायवा ट्रकमध्ये कल्लाळ येथून गोदावरी नदी पात्रातून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाळू भरून आणली होती. हा हायवा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत कैलास उद्धव रेनके रा. बेनाळ ता. लोहा याच्याविरुद्ध सोनखेड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिसरी कारवाई बेटसांगवी परिसरात करण्यात आली. बेटसांगवी शिवारात ३३ केव्ही परिसरात पिंपळगाव निमजीकडून बेटसांगवीकडे जाणारा एमएच २० इजी ६४४४ क्रमांकाचा हायवा ट्रक पोलिसांनी थांबवला. या प्रकरणात गाडी मालक चांदू व्यंकटी डक याच्या सांगण्यावरून हायवा चालक मारुती नागोराव कदम याने पिंपळगाव निमजी शिवारातून गोदावरी नदी पात्रातून कोणत्याही पावतीशिवाय वाळू चोरून आणली होती. पोलिसांनी चालक मारुती नागोराव कदम रा. सावरगाव नसरत आणि मालक चांदू व्यंकटी डक रा. पिंपळगाव निमजी या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
सोनखेड पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करून तीन हायवा ट्रक आणि १५ ब्रास रेती असा १ कोटी २० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाचजणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस अंमलदार वामन नागरगोजे, ज्ञानेश्वर तिडके, मोकळे, मुंडकर, दिगंबर कवाळे, होमगार्ड संदीप कदम यांनी केली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्याविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याची पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!