क्राईम

नांदेडमध्ये एका तासात पाच जणांना लुबाडले..!

चैतन्यनगर परिसरात पहाटे दहशत; सेवानिवृत्त बँक अधिकारी गंभीर जखमी, घटनेच्या २४ तासांपूर्वीच दिले होते पोलीस अधीक्षकांना निवेदन

नांदेड – शहरातील चैतन्यनगर परिसरात शनिवारी पहाटे अवघ्या एका तासाच्या कालावधीत बँक अधिकाऱ्यासह पाच जणांना लुबाडल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी बी. एम. बनसोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेवानिवृत्त बी. एम. बनसोडे हे मागील २५ वर्षांपासून नियमितपणे पहाटे ४.१५ ते ५.१५ या वेळेत फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. शनिवारीही ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. गाडगेबाबा चौकात दुचाकीवरून आलेल्या तोंडाला पट्ट्या बांधलेल्या तीन तरुणांनी त्यांना अडवले. या तरुणांनी बनसोडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या दोन्ही खिशांची तपासणी केली असता पैसे मिळाले नाहीत. मात्र, त्यांच्या उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना खाली पाडण्यात आले आणि मारहाणही करण्यात आली. साईबाबा मंदिरासमोर रोहित किराणा दुकानाजवळ ही घटना घडली. दुकानाच्या पायरीवर आणि समोर जवळपास अर्धा लिटर रक्त सांडले होते. घटनास्थळापासून यशोधरा हॉस्पिटलपर्यंतच्या सुमारे दीडशे मीटर अंतरावर अक्षरशः रक्ताचा सडा पडल्याचे दिसून येत आहे. हल्ल्याची तीव्रता या रक्ताच्या खुणांवरून स्पष्ट होते.

बनसोडे यांच्यावरील हल्ल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत देशमुख जिमसमोर एका तरुणाचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिसरी घटना सिद्धार्थनगर सावंगी पाटीजवळ घडली. येथे सोनवणे नावाच्या ट्रॅक्टरचालकाच्या खिशातून एक हजार रुपये काढून घेण्यात आले. चौथ्या घटनेत आसना नदीच्या पुलाजवळ कोथिंबीर विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला अडवण्यात आले. त्याच्याकडील कोथिंबीर, मोबाईल आणि खिशातील आठशे रुपये लुटण्यात आले. पाचवी घटना रेल्वे डिव्हिजन कार्यालयासमोर घडली. येथे एका दुचाकीस्वाराला धडक देऊन खाली पाडण्यात आले. अशा प्रकारे एकाच परिसरात एकापाठोपाठ पाच रोड रॉबरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या सर्व घटना एकाच टोळीने घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलीस अधीक्षकांना २४ तासांपूर्वीच दिले होते सुरक्षेसाठी निवेदन विशेष म्हणजे, आसना गार्डन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन आसना माॅर्निग वाॅक ग्रुपच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना दिले होते. या निवेदनाला २४ तासही उलटले नाहीत, तोच चैतन्यनगर परिसरात नागरिकांना लुबाडल्याच्या पाच घटना घडल्या. ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. सध्या नागरिकांनी पहाटे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शक्यतो सोबत रोख रक्कम किंवा किमंती दागिने बाळगू नयेत. पुरेसा उजेड झाल्याशिवाय एकट्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे नागरिक दिवाळीच्या आनंदात असताना चोरट्यांनीही दिवाळी साजरी केली असल्याचा प्रकार पुढे आला आहे पोलीस शिक्षकांना निवेदन देऊ नये विमानतळ पोलिसांनी या प्रकरणात सुरक्षेच्या कोणत्याही उपाययजना केल्या नाही. शेकडो नागरिक या रस्त्यावर नियमितपणे फिरण्यासाठी जात असतात त्यात महिलांचे ह प्रमाण मोठे आहे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवण्याचे प्रकारही काही दिवसापूर्वीच घडले होते. या परिस्थितीतही विमानतळ पोलिसांकडून सुरक्षितता न करणे म्हणजे नागरिकांच्या धोक्यात वाढ करणे असाच प्रकार ठरत आहे. या घटने संदर्भात विमानतळ पोलिसांसह शहर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!