क्राईम

नांदेडमध्ये भाग्यनगर ठाण्यात अटकेच्या भीतीने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न..!

ठाण्याच्या इमारतीवरून मारली उडी, अल्पवयीन मुलींना नेले होते दोघांनी पळवून, जखमी तरुणाची प्रकृती गंभीर

नांदेड – दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी सोलापूर येथून पकडून आणल्यानंतर आता आपल्यावर कारवाई होईल या भीतीने दोघांपैकी एकाने भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीहून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दुसऱ्या तरुणाला अटक केली असून त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले होते.

नांदेड शहरातील एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बिलोली आणि माजलगाव येथील दोन अल्पवयीन मुली ४ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाल्या होत्या. पालकाच्या तक्रारीवरून त्यांना पळवून नेल्याचा गुन्हा भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात असताना त्या दोन मुली परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील झुट्टा येथील कार्तिक विलास झुटे आणि ओमकार रामेश्वर शहाणे या दोन तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तांत्रिक मदतीने त्यांचे लोकेशन शोधून काढले; मात्र वारंवार ते ठिकाण बदलत असल्याने ते पकडले जात नव्हते.

त्याचवेळी सोलापूर रेल्वे स्थानकावर सोलापूर रेल्वे पोलिसांनी या दोन अल्पवयीन मुली पाहता त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी संपूर्ण माहिती दिली. ही माहिती सोलापूर रेल्वे पोलिसांनी नांदेड पोलिसांना दिली. माहिती प्राप्त होताच भाग्यनगर पोलिसांचे एक पथक थेट सोलापूरला पोहोचले. त्यांनी सोलापूरहून दोन अल्पवयीन मुली आणि दोन तरुणांना सोमवारी सकाळी साडे आठ वाजेदरम्यान भाग्यनगर ठाण्यात आणले. भाग्यनगर ठाण्यात आणल्यानंतर या दोन तरुणांच्या अटकेची प्रक्रिया सुरू होती. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात होती. यासाठी नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अटक आणि कारवाईच्या भीतीने घाबरलेल्या ओमकार रामेश्वर शहाणे (वय २१) याने भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीहून थेट उडी मारली. यात तो गंभीर झाला. त्याच्या डोक्याला मार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला तातडीने नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे कार्तिक विलास झुटे (वय १९) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी भाग्यनगर ठाण्यात पोहोचले. त्यांनी घटनेबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक संतोष तांबे याच्याकडून घेतली. व्यंजने यांनी तपासाबाबत भाग्यनगर पोलिसांना सूचनाही दिल्या. पोलिसांकडून त्या अल्पवयीन मुलींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

नांदेड ग्रामीण ठाण्यात पत्नीच्या खुनातील आरोपी असलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेल्या सोमवारी घडली होती. आठ दिवसातच आज सोमवारी भाग्यनगर ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांच्या ताब्यातील आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यातील घटनेचा तपास सीआयडीकडून केला जात आहे. आता भाग्यनगर ठाण्यात ही घटना समोर आली आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुखांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे आता या घटनेनंतर तरी काही कारवाई होईल का याकडेही आता लक्ष लागले आहे. दुसरीकडे नांदेड शहरातील त्या दोन मुली राहत असलेल्या खाजगी हॉस्टेल चालकाविरुद्धही मुलींच्या सुरक्षेसंदर्भाने निष्काळजीपणा केल्याबाबत पोलीस काय कारवाई करतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!