क्राईम

किनवट तालुक्यात सिंगरवाडीच्या शेतकऱ्याने आंतरपीक म्हणून केली चक्क गांजाची लागवड..! स्थानिक गुन्हा शाखेची धाड..!

स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईत ९ लाख २४ हजारांचा गांजा जप्त, कापूस आणि मिरचीच्या पिकात आढळली लहान मोठी २६ हिरवी गांजाची झाडे, शेतकऱ्याविरुद्ध किनवट ठाण्यात गुन्हा दाखल, जिल्ह्यात मास रेड मोहिमेत ४१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नांदेड – किनवट तालुक्यात सिंगरवाडी येथे एका शेतकऱ्याने आंतरपीक म्हणून चक्क गांजाची लागवड केल्याचे स्थानिक गुन्हा शाखेने टाकलेल्या किनवट तालुक्यातील एका धाडीत स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईत ही गांजा शेती पकडण्यात आली आहे. कापूस आणि मिरचीच्या पिकात आंतरपीक म्हणून लावलेले लहान मोठे असे एकूण २६ हिरवी गांजाची झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत तब्बल ९ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे आणि त्यांचे पथक किनवट आणि माहूर उपविभागात अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी शुक्रवारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी किनवट येथील थार गावाजवळ गुप्त बातमीदाराकडून किनवट तालुक्यात सिंगरवाडी शिवारातील एका शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केली जात असल्याची माहिती मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या कायदेशीर परवानगीनंतर राजपत्रित अधिकारी आणि दोन शासकीय पंच यांना सोबत घेऊन धाडीचे नियोजन झाले. किनवट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनाही या कारवाईबाबत माहिती देण्यात आली. १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी सिंगरवाडी शहरातील शेत गट क्रमांक ४२ मध्ये स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकला. दत्ता जाधव याच्या शेतात कापूस आणि मिरचीच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाला जाधवच्या शेतातून लहान-मोठे एकूण २६ गांजाची हिरवी झाडे आढळली. या गांजाच्या झाडांचे वजन १८ किलो ४८० ग्राम भरले. या जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत ९ लाख २४ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी शेतमालक दत्ता खंडू जाधव याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे.

या प्रकरणात एनडीपीएस ऍक्ट तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, किनवटचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक माधव केंद्रे, उपनिरीक्षक बळीराम दासरे आणि त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार दिलीपकुमार चंचलवार, देविदास चव्हाण, ज्ञानोबा कवठेकर, रितेश कुलथे, सिद्धार्थ सोनसळे तसेच किनवट पोलीस ठाण्याचे मुंडे, वाघमारे, आत्राम, कुडमेथे, जाधव आणि राजपत्रित अधिकारी नायब तहसीलदार बालाजी फुले तसेच शासकीय पंच आणि फॉरेन्सिक टीमने पार पाडली.

दुसरीकडे जिल्हा पोलिसांनी १३ नोव्हेंबर रोजी केलेल्या मास रेड मोहिमेत ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी ४१ आरोपीवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये १ लाख १२ हजार ७६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने शुक्रवारी एकाच दिवशी शहरी आणि ग्रामीण भागातील संशयित ठिकाणावर धाडसत्र राबविले. दारूबंदी, मटका तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायावर प्रभावी कारवाई केली. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. नांदेड जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविणार आहे. अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी निर्भयपणे स्थानिक पोलीस ठाण्यास किंवा डायल 112 वर देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!