नांदेड – जिल्ह्यात विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पोलीस बंदोबस्तादरम्यान जुन्या नांदेडातील बर्की चौकातील एका चार चाकी वाहनात रोख ८ लाख रुपये पकडण्यात आले आहेत. ही रक्कम नेमकी कशाची आहे, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. या कारवाईत वाहनासह पोलिसांनी रोख रक्कम जप्त केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोलिंग करुन वाहने चेक करुन अवैध पैशाची वाहतूक करणाऱ्यांवर व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आगामी निवडणुकी संबधाने ८ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन इतवाराच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, परि. पोउपनि, विलास पवार, गुन्हे शोध पथक, बिट मार्शल ०१ व ४ असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दुपारी १२.३० वाजताचे सुमारास बर्की चौक नांदेड याठिकाणी CMD Connecting Commerce असे नाव असलेली बंद बॉडीची MH 14-LB- 1281 या क्रमांकाचे चारचाकी वाहन आढळून आले. सदरचे चारचाकी वाहन थांबवुन तपासणी केली असता त्या वाहनामध्ये ८ लाख रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम कशाची आहे याबाबत सदर वाहनामधील व्यक्तींना विचारले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणून सदर रक्कम व वाहन पंचासमक्ष जप्त करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा केले आहे.
या सर्व कारवाईमध्ये एफएसटी, आयटी, इत्यादी संबधीत विभागांना सूचित केले आहे. तसेच निवडणुक आयोगाच्या पीएस आणि इएसएमएस पोर्टलमध्ये सदर जप्तीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. सदर रक्कमेबाबत संबधीत विभाग चौकशी करुन पुढील कारवाई त्यांच्याकडून केली जाणार आहे.
इतवारा पोलीसांनी रोख ८ लाख रुपये नगदी व १० लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी हे पोलीस स्टेशन इतवारा प्रभारी अधिकारी रणजीत भोईटे व त्यांच्या पथकाने केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.
दरम्यान, शनिवारी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.