
नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त २०२३-२४ या वर्षासाठीचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. २०२३-२४ या वर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार झरी (परभणी) येथील सूर्यकांतराव देशमुख (कांतराव काका झरीकर) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जानेवारी रोजी ११ वा. सहकार विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे राहतील.
कांतराव काका झरीकर यांना महाराष्ट्र शासनाने कृषी-भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी कृषी, जलसंधारण, कृषीपूरक उद्योग क्षेत्रात विविध प्रयोग करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी सामाजिक, जांभुळबेट संवर्धन, एक गाव-एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमी चळवळीच्या पायाभरणीकरिता सामाजिक योगदान दिलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना २०२३-२४ या वर्षीचा जीवनसाधना गौरव पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय उत्कृष्ट महाविद्यालय शहरी विभाग- लातूर येथील दयानंद फार्मसी महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षक- शहरी विभाग परभणी येथील शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. रोहिदास नितोंडे. तरुण शिक्षक संशोधक पुरस्कार- महाविद्यालतीन शिक्षकांमधून लातूर येथील दयानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. क्रांती सातपुते आणि विद्यापीठ परिसर संकुलामधून संगणकशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. अर्चना साबळे यांना जाहीर झालेले आहेत. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
३० जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात दु. २:३० वा. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम या विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर राहणार आहेत. या सत्रात परीक्षा विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच विद्यार्थी विकास विभागातर्फे दिले जाणारे विविध पुरस्कार, क्रीडा विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिले विविध पुरस्कार या सत्रात देण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव या समारंभामध्ये होणार आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी कळविले आहे.
भारतातील सामाजिक विषमता लक्षात घेता कांतराव काकांनी मांडलेली ‘एक गाव एक सुंदर स्वच्छ स्मशानभूमी’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील सर्वात किचकट जातीव्यवस्था व अंतर्गत उच्चनीचता, आपसातील वैरभाव व मतभेद वाढण्यासाठी मदत करते. हजारो वर्षांपासून अनेक समाजसुधारकांनी समाजातील जातीवाद नष्ट होण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत; परंतु दुर्दैवाने त्यात यश आले नाही. वेगवेगळ्या प्रकारे जातीवाद नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी आंतरधर्मीय वा आंतरजातीय विवाह ही एक कल्पना पुढे आली आहे; परंतु असे लक्षात आले की, अशा विवाहामुळे जातिभेद निर्मूलन होऊ शकले नाही. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाहामुळे उलट नवीन पोटजाती जन्माला आल्या आहेत. आंतरधर्मीय विवाह व आंतरजातीय विवाह दोनच वेगवेगळ्या समाजातील कुटुंबांना किंवा दोन व्यक्तींना जवळ आणतात. तर ‘एक गाव एक सुंदर स्वच्छ स्मशानभूमी’ यामुळे गावातील सर्वच जाती व समाज एकत्रित येतात. सर्व समाज एकत्र आले तर निश्चितपणे जातीवाद कमी होत जाऊन एक दिवस तो नष्ट होईल.भारतीय समाजात तोरण व मरण ह्या दोन समस्या निर्माण झाल्या आहेत; परंतु मरणानंतर जर अंत्यविधीसाठी ‘एक गाव एक सुंदर स्वच्छ स्मशानभूमी’ ही संकल्पना गावोगावी राबविण्यात आली तर गावगाड्यातील आपसातील संवाद व संपर्क वाढून समाजात बंधुभाव, एकात्मता व शांतता निर्माण होईल असे म्हणायला काहीच हरकत नाही. असे झाले तर भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक व आर्थिक समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता निर्माण होऊ शकते. एवढी या ‘एक गाव एक स्मशानभूमी’ संकल्पनेची व्याप्ती आहे.
• ॲड. इंजि. पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ