
नांदेड – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असताना आता नांदेड पोलीस विभागाकडून कारवाया वेगात सुरू आहेत. नांदेडमध्ये आज सोमवारी पोलिसांनी रोख १७ लाखांसह १ लाख ३२ हजारांचा शस्त्रसाठाही जप्त केला आहे. त्यामुळे निवडणूक काळातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि लोकसभा निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. विविध पक्षांचे नेते नांदेडमध्ये येत आहेत. त्यांच्या जाहीर सभा सुरू आहेत. प्रचाराला वेग आला असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात चालणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागासह पोलीस दल वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतत पेट्रोलिंग करुन वाहने तपासून अवैध पैशाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी पोलीस स्टेशन इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, परि. पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, गुन्हे शोध पथकाने ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना १२.३० वाजताचे सुमारास बाफना टी पॉइंट नांदेड या ठिकाणी SIS PROSEGUR असे नाव असलेली बंद बॉडीची एमएच १२- युएम ४२१६ या क्रंमाकाची चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये १७ लाख ३५ हजार ३७५ रुपये रोख आढळले. सदर रक्कम ही कशाची आहे याबाबत वाहनामधील व्यक्तींना विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सदर रक्कम व वाहन पोलीस स्टेशन इतवारा येथे आणून पंचासमक्ष जप्त करीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा केले आहे.
या सर्व कारवाईमध्ये एफएसटी, आयटी, इत्यादी संबधीत विभागांना सूचीत केले आहे. तसेच निवडणुक आयोगाच्या पीएस आणि इएसएमएस पोर्टलमध्ये सदर जप्तीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. सदर रक्कमेबाबत संबधीत विभाग या पुढील चौकशी करुन कारवाई केली जाणार आहे. रोख १७ लाख ३५ हजारांसह १० लाखांचे वाहन असा एकूण २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन इतवारा प्रभारी अधिकारी रणजीत भोईटे व त्यांच्या पथकाने केली आहे. त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
नांदेडमध्ये ७२ तलवारी जप्त…लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध शस्त्र व अवैध धंदे यावर परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वजिराबाद पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना रविवारी रात्री सव्वा अकरा वाजेदरम्यान वाजता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लंगर साहिब गुरुद्वाराच्या पाठीमागील दुकानामध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवार, खंजर दोन्ही बाजुने धारदार व घातक शस्त्र दुकानामध्ये बाळगून त्यांची चोरटी विक्री होत आहे. तिथे छापा मारला असता तिथे दर्शनसिंघ पि. लाभसिंघ वय ३२ वर्षे रा.बंधी रोडलु ता. तलवलीसाबु जि. भटीडा (पंजाब) ह.मु. उदासी मठासमोर नगीनाघाट नांदेड हा दुकानात बेकायदेशिररित्या ७२ तलवारी, ९ खंजर व १५ धारदार भाल्याचे टोक असे एकूण १ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे शस्त्र विक्री करण्याचे उद्देशाने बाळगले होते. हा साठा जप्त करून दर्शनसिंघ पि. लाभसिंघ विरुद्ध पोलीस वजिराबाद ठाण्यात शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक वचिष्ठ बिक्कड हे करीत आहेत.