सामाजिक

राजकीय मानापमानासाठी अहिल्यादेवींच्या स्मारकाचा वापर करू नका..!

आमदार बालाजी कल्याणकर यांना महेंद्र देमगुंडे यांचा इशारा, उद्घाटन कार्यक्रमात गोंधळ घालण्याची आमदार बालाजी कल्याणकर यांची भूमिका, धनगर समाजात तीव्र संताप..!

नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून सुरू असलेले राजकीय मानापमानाचे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले नाही तर उद्घाटन कार्यक्रमात गोंधळ घालण्याची भूमिका आमदार बालाजी कल्याणकर घेत असल्याच्या चर्चेने धनगर समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराचा निषेध करत मौर्य प्रतिष्ठानचे सचिव महेंद्र देमगुंडे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांना परखड इशारा दिला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण द्या, एवढेच नव्हे तर आणखी कोणाला निमंत्रित करायचे असेल, कोणत्याही नेत्याला किंवा मान्यवराला बोलवायचे असेल तर जरूर बोलवा. धनगर समाजाचा त्याला अजिबात विरोध नाही. तुम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला बोलवायचे असेल तर आयोजकांकडे आग्रह धरा. तुमची भूमिका मांडा. मात्र, निमंत्रणाच्या मुद्द्यावरून कार्यक्रमात गोंधळ घालण्याची भाषा करणे किंवा कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.

आमदार बालाजी कल्याणकर यांना माझा थेट सवाल आहे, समाजाच्या पाठिंब्यावर आमदारकी मिळवायची आणि त्याच समाजाच्या आराध्य दैवताच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय मानपानाचे राजकारण करायचे, हे कितपत योग्य आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक हे कोणत्याही राजकीय पक्षाचे, नेत्याचे किंवा लोकप्रतिनिधीचे वैयक्तिक स्मारक नाही. ते संपूर्ण समाजाच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे या स्मारकाच्या उद्घाटनाला राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

आमदार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण मिळाले पाहिजे, अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आग्रह धरण्यात गैर काहीच नाही. परंतु, तुमच्या राजकीय अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. हा कार्यक्रम अहिल्यादेवींच्या सन्मानाचा आहे, कोणाच्या राजकीय प्रतिष्ठेचा नाही. धनगर समाजाचा कोणत्याही नेत्याला निमंत्रण देण्यास विरोध नाही; मात्र अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उद्घाटनात राजकारण करून गोंधळ निर्माण करण्याच्या प्रवृत्तीला तीव्र विरोध आहे. अहिल्यादेवींच्या स्मारकाचे लोकार्पण सन्मानाने आणि शांततेत होऊ द्या. निमंत्रणाचा आग्रह धरा, पण गोंधळाची धमकी देऊ नका. समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केल्यास समाज निश्चितच जाब विचारेल, असा इशारा मौर्य प्रतिष्ठानचे सचिव महेंद्र देमगुंडे यांनी दिला.

आमदार बालाजी कल्याणकर यांनी धनगर समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. कार्यक्रमात कोणी गोंधळ घालण्याचा किंवा उद्घाटन सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर धनगर समाज लोकशाही मार्गाने त्याचा जाब विचारेल आणि समाजाची ताकद काय असते हे दाखवून देईल. राजकारण करण्यासाठी अनेक व्यासपीठे आहेत; मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक हे राजकारणाचे व्यासपीठ होऊ शकत नाही. हे आमदार बालाजी कल्याणकर यांनी लक्षात ठेवावे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!