
नांदेड – नांदेड लातूर महामार्गावर गुरुवारी सायंकाळी एक चारचाकी गाडी दुभाजकावर आढळून झालेल्या स्फोटात कारने पेट घेतला. या घटनेत गाडीतील एक व्यक्ती जागीच ठार झाला आहे. या घटनेत आता पोलिसांकडून मयताची ओळख पटवली जात आहे.
नांदेड – लातूर महामार्गावर एमएच २६ एके ६४४४ या क्रमांकाची कार गुरुवारी नांदेडहून लातूरकडे जात होती. ही कार सायंकाळी ७.३० च्या सुमारास लोहा तालुक्यातील सोनखेडच्यासमोर आंबेसांगवी शिवेवर हांडे यांच्या शेताजवळ पोहोचली असता चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळली. यावेळी गाडीचा स्फोट झाला आणि गाडीने पेट घेतला. हा स्फोट इतका भीषण होता की चालकाला गाडीबाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. चालकही गाडीतच जळाला. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी मदतीचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत खूप वेळ झाला होता. चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. या घटनेतील मयताची ओळख पटविण्याचे काम सोनखेड पोलिसांकडून केले जात आहे.




