
नांदेड – नांदेडमध्ये केएफ फायनान्सचा कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या खून करण्यात आला होता.२४ ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली.या तीन आरोपींना आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे नांदेड पोलिसांनी या प्रकरणात आणखी पाच संशयतांना ताब्यात घेतल्याची माहिती ही पुढे आली आहे.
मुदखेड तालुक्यातील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या खून प्रकरणातील आरोपी जयकुमार उर्फ शेरा गायकवाड , शेख अमीर शेख हुसेन या दोघांनी २२ ऑक्टोबर रोजी माळकौठा गावातून शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचे अपहरण करून आणले होते. तर इम्रान खान शहबाज खान याने वसुलीसाठी सक्ती केली असा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार केएफ फायनान्सचा संचालक अजून फरार आहे. त्याच्या शोधासाठी एलसीबीची सहा पथक आणि गुन्हे शाखेची दोन पथक राज्यात ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.
राज्यमंत्री मेघनाताई साकोरे -बोर्डीकर यांनी माळकौठा येथे कुटुंबियांचे केले सांत्वन… मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे आणि नांदेड तालुक्यातील बोरगाव तेलंग येथील मयत शेतकरी शंकर क्षीरसागर आणि यांच्या कुटुंबियांची राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी आज सोमवारी भेट घेऊन सांत्वन केले. शासन त्यांच्या पाठीशी असून, शासनाच्या विविध योजनांमधून पात्रतेनुसार लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कठीणप्रसंगी शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून, विविध शासकीय योजनांचे पात्रतेनुसार लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माळकौठा येथे आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.यावेळी बोरगाव तेलंग येथे तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
राज्यमंत्री मेघनाताई साकोरे -बोर्डीकर यांनी माळकौठा येथे कुटुंबियांचे केले सांत्वन…


