
नांदेड – पत्नीच्या खुनाच्या आरोपात नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीचा नांदेड ग्रामीण ठाण्यात मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. पोलिसांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतलेल्या या आरोपीने गळफास घेतला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिली. त्याचवेळी या प्रकरणात अधिक पोलीस तपास केला जात असल्याचेही ते म्हणाले. या घटनेमुळे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नवीन नांदेडातील वाजेगाव परिसरात एका वीट भट्टीवर काम करणाऱ्या छाया सुशील हैबते या महिलेचा तिचा पती सुशील महाजन हैबते याने सोमवारी पहाटे गळा दाबून खून केल्याचा आरोपावरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी सकाळी सुशील हैबते याला ताब्यात घेतले. या प्रकरणात दीक्षा सुरेश कांबळे यांच्या तक्रारीवरून सुशील हैबतेविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला सकाळीच ताब्यात घेऊन नांदेड ग्रामीण ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवले होते. दुपारी सव्वा चारच्या सुमारास त्याने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कोठडीतील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी तातडीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. सोबतच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्यासह इतर अधिकारीही नांदेड ग्रामीण ठाण्यात पोहोचले. या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यातील सुशील महाजन हैबते याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातील खुनाच्या आरोपीचा अशा प्रकारे झालेला मृत्यू आता संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे.
विशेष म्हणजे दुपारी घडलेल्या घटनेनंतर रात्री नऊ वाजेपर्यंत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात मयताचे नातेवाईक पोहोचले नव्हते. त्यामुळे घटनेबाबतचा संशय अधिक बळावत असल्याचेही स्पष्ट होत आहे. पोलिसांनी माध्यमांनाही कोठडीपर्यंत पोहोचू दिले नाही. त्याचवेळी मयताचा मृतदेहही बाहेर काढला नव्हता. पोलीस दलाचे फॉरेन्सिक वाहन घटनास्थळी पोहोचले होते; मात्र तपासाला रात्री ९ वाजेपर्यंत सुरुवात झाली नव्हती. एकूणच आता सुशील हैबते यांचे नातेवाईक आल्यानंतर या प्रकरणात कोणती भूमिका घेतली जाईल याकडेही लक्ष लागले आहे. या घटनेने पती-पत्नी दोघेही उरले नाहीत. पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.



