महापालिका

खुशखबर..! नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनास प्रारंभ..!

दिवाळीनिमित्त फेस्टिवल ॲडव्हान्सही मिळणार, सेवानिवृत्तांसह कंत्राटी कामगारांनाही दोन दिवसांत वेतन दिले जाणार

नांदेड – देशात सर्वात मोठा सण असलेली दिवाळी तोंडावर आली असतानाही आपले वेतन कधी होणार याची चिंता नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांना सतावत होती. ही चिंता महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या विशेष प्रयत्नातून आता दूर झाली आहे. महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे वेतन जमा होण्यास प्रारंभ झाला असून महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतनही उद्यापासून केले जाणार आहे. त्याचवेळी आयुक्तांच्या दूरदृष्टीने कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळीचे वेतन वेळेवर दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठ दहा दिवसापासून नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनाची प्रतीक्षा होती. दिवाळीसारखा आनंदाचा मोठा सण तोंडावर आला असताना वेतन कधी होणार याची चर्चा महापालिकेत सुरू होती. त्यात जीएसटी अनुदान लांबल्यामुळे वेतन वेळेवर होईल की नाही याबाबत चिंताच होती. याच अनुषंगाने महापालिकेतील काही कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महापौरांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरच दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात वेतन कधी होईल याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यात महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना दरमहा मिळणारे जीएसटी अनुदानही लांबले होते. त्यामुळे आता दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर वेतन करायचे कसे असा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे होता. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सोमवारी थेट मुंबई मंत्रालय गाठले. तिथे त्यांनी यासंदर्भातील आर्थिक तजवीज करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होईल, अशी व्यवस्था केली आणि एका दिवसात ते मुंबईहून परत आले. परत येताच महापालिकेच्या वित्त विभागाला या संदर्भातील प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली.

पहिल्या टप्प्यात महापालिकेतील सेवानिवृत्तांना वेतन देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. महापालिकेच्या १ हजार ४२० सेवानिवृत्तांना ४ कोटी २१ लाख रुपये वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचवेळी महापालिकेच्या १ हजार ३६० कर्मचाऱ्यांचे वेतन उद्या बुधवारपासून बँकेत जमा होईल. यासाठी महापालिकेने ६ कोटी ४० लाख रुपयांची तजवीज केली आहे. या प्रक्रियेलाही प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या सेवानिवृत्त तसेच विद्यमान कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी वेतन मिळावे यासाठी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. विविध विभागातील जवळपास ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही वेतन दिवाळीपूर्वीच म्हणजेच एक ते दोन दिवसात केले जाईल असे आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन करणे हे नियमित बाब असली तरीही जीएसटी अनुदान लांबल्यामुळे हे वेतन दिवाळीपूर्वी होईल की नाही यासाठी याची चिंता सतावत होती; मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ती चिंता दूर करण्यात आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांना यश आले आहे.

महापालिकेच्या ४०० कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त फेस्टिवल ॲडव्हान्सही दिला जाणार..! महापालिकेच्या ४०० कर्मचाऱ्यांनी दिवाळीनिमित्त अग्रीम रकमेची मागणी महापालिका प्रशासनाकडे नोंदवली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये फेस्टिवल ॲडव्हान्स अर्थात सण अग्रीम दिला जातो. त्यासाठी ४८ लाख रुपये लागणार आहेत. हे ४८ लाख रुपयेही देण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे केलेल्या विशेष प्रयत्नामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन प्राप्त होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!