आरोग्य

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट, अधिकारी, कर्मचारी गैरहजर..!

कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईचे आदेश, चांगल्या आरोग्य सेवा देण्याच्या सूचना

नांदेड : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी रविवारी रात्री ८.३० वाजता नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील सोनखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली. रात्रीच्या वेळी स्वतः आरोग्यमंत्रीच आरोग्य केंद्रात दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत, रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत तसेच आरोग्य सेवेत होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत मंत्र्यांकडे तक्रारी मांडल्या. मंत्री आबिटकर यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तसेच आरोग्य केंद्रातील उपलब्ध सुविधा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळीआरोग्य सेवेत हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची गंभीर दखल घेत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासह बदलीचे आदेश जागेवरच दिले.

सामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची हेळसांड कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या अचानक पाहणी आणि कारवाईतून आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिला. मंत्र्यांनी रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात जाऊन परिस्थितीची पाहणी केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. केवळ आढावा बैठका न घेता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर तातडीने निर्णय घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, रुग्णसेवेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी अधोरेखित केली.

राज्याचे आरोग्यमंत्री जिल्ह्यात उपस्थित असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रावर अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असतील तर इतर वेळी आरोग्य सेवेचे काय हाल असतील, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. यातून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारभारातील नियंत्रण आणि कार्यपद्धतीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला रवाना झाल्यानंतर आरोग्यमंत्री आबिटकर हे निवांत राहतील, अशी अपेक्षा जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना होती; परंतु त्यांनी ती अपेक्षा फोल ठरवत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी थेट सोनखेड प्रार्थमिक आरोग्य केंद्र गाठले आणि अपेक्षितच घडले. अधिकारी, कर्मचारी तेथे गैरहजर होते. त्यांच्या बदलीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!