
नांदेड – नांदेड शहरातील वजिराबाद ठाणे हद्दीत दुचाकीच्या कट मारण्याच्या कारणावरून गंगाचाळ येथे सिद्धार्थ उर्फ धीरज वैजनाथ थोरात, वय १७ वर्ष या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून दोघांचा शोध घेतला जात आहे.
शहरातील नल्लागुट्टा चाळमध्ये राहत असलेला सिद्धार्थ उर्फ धीरज वैजनाथ थोरात याचा भीमघाट येथील काही तरुणांशी केवळ दुचाकीची कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातूनच सिद्धार्थ उर्फ धीरज थोरातवर पाच जणांनी धारधार शस्त्रांनी वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेले परंतू जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या खून प्रकरणातील संशयित आरोपींची पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्यात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये एका राजकीय नेत्याच्या सुपुत्राचाही समावेश आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.



