
नांदेड – केवळ दहा हजार रुपयांसाठी शनिवारी नांदेडमध्ये केएफ फायनान्सचा कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी अर्थात विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. प्रारंभी खालसा फायनान्सच्या जाचामुळे शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा खून केला असल्याचे वाटले असले तरीही या प्रकरणाची पाळेमुळे आता कुबेरफल या नागरी सहकारी पतसंस्थेपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे या पतसंस्थेमध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हे प्रकरण आता विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदेड शहर उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरणाचा लोक तपास करणार आहे. विशेष तपास पथकात विविध विभागातील दहा पोलीस अधिकारी , कर्मचारी यांचा समावेश आहे. फायनान्सचा सर्व व्यवहार बघणारा आरोपी अस्लम याला अटक करण्यात आली. आतापर्यंत एकूण या प्रकरणात पाच आरोपीना अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले.
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत शिंदे यांचा अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. खाजगी फायनान्स प्रकरणाचे धागेद्वारे आता थेट नवा मोंढा येथील कुबेरफल या नागरी सहकारी पतसंस्थेपर्यंत पोहोचले आहेत. वजीराबाद पोलिसांनी रविवारी या पतसंस्थेच्या कार्यालयात छापा मारला. या छापेमारीत काही कागदपत्र आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे आता या खून प्रकरणात ‘कुबेरफल’चा नेमका किती आणि कसा सहभाग आहे याकडे लक्ष लागले आहे.
२४ ऑक्टोबर रोजी दुपारी नांदेड शहरातील हिंगोली गेट भागात केएफ या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा रोजी मृतदेह आढळला होता. शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या पत्नी ज्योती शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी शिंदे यांना माळकौठा येथून उचलून आणणाऱ्या केएफ फायनान्सच्या तिघाविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. शिंदे यांना जयकुमार उर्फ शेरा भगवान गायकवाड रा.गोपाळचावडी, शेख आमिर शेख साहेब हुसेन रा. मलंग बाबा बिल्डिंगजवळ खुदगई नगर देगलूर नाका आणि इमरान खान शहाबाज खान रा. बुऱ्हान मशीदजवळ गोवर्धनघाट या तिघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून केएफ इंटरप्राईजेस या फायनान्सच्या कार्यालयात आणले. तेथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानंतर आणखी दोघांना अटक केली असून त्यातील अस्लमची या प्रकरणात प्रमुख भूमिका असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. त्याचवेळी आरोपींच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेची सहा आणि इतर सहा अशी बारा पथके रवाना झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील खाजगी फायनान्स हे खालसा फायनान्स नसून कुबेरफल इंटरप्राईजेस असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तपासात आता वजीराबाद पोलिसांनी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी नवा मोंढा येथील कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयावर छापा मारत महत्वाची कागदपत्र जप्त केली. त्यामुळे या कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्थेचे नेमके संचालक कोण आहेत? या पतसंस्थेचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याबाबतचा तपास पोलिसांकडून केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी या प्रकरणाच्या तपासात पोलीस मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले होते. या तपासात अनेक धागेदोरे असून ते आत्ताच स्पष्टपणे उलगडता येणार नाहीत असेही त्यांनी सांगितले होते. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अनेक बाबींचा खुलासा केला नव्हता. त्यात वजिराबाद ठाणे या प्रकरणात काही महत्वाच्या बाबीपर्यंत पोहचू शकत नाही हे लक्षात घेऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य निश्चित वाढले आहे. नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या नेतृत्वाखालील या विशेष पथकात तीन पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस अंमलदारांचा समावेशही करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव या चौकशीचा वेळोवेळी आढावा घेणार आहेत. यापूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर महानगराध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांना झालेल्या मारहाणी संदर्भानेही एक एसआयटी गठीत करण्यात आली आहे. त्या प्रकरणातील चौकशी आता कुठपर्यंत आली ही बाब गुलदस्त्यातच आहे.



