महापालिका

नांदेड महापालिकेत सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांच्याकडील स्वच्छता विभागाचा पदभार काढला..!

पदोन्नतीनंतरही दोन वर्षापासून सोडवत नव्हता स्वच्छता विभागाचा पदभार, कचरा प्रकरण भोवले लोकन्याय विकास आघाडीने थेट विभागीय आयुक्तांकडे केली होती तक्रार, रावण सोनसळे आता स्वच्छता विभागाचे नवे कारभारी

नांदेड – नांदेड महापालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही अंगावर घेणारे सहायक आयुक्त गुलाम सादिक यांचा स्वच्छता विभागाचा पदभार अखेर काढून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. हा पदभार आता इतवारा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उपायुक्त समकक्ष पदावरील पदोन्नतीनंतरही सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार सादिक यांना सोडवत नव्हता अखेर डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रकरणानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांची जवळपास दोन वर्षांपूर्वी मालमत्ता विनियोग अधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती; मात्र या पदोन्नतीनंतरही त्यांनी स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त पद सोडले नव्हते. त्यामुळे या पदाची त्यांची जवळीकता ही चर्चेची विषय ठरली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून सुरू करण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी शहरातील शंकरराव चव्हाण पुतळा परिसरात कचरा आणून टाकत स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे प्रकरणही चांगलेच चर्चेत आले होते. त्याचवेळी तुप्पा डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रकरणात लोकन्याय विकास आघाडीने थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. ५ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात विभागीय आयुक्तांकडे सुनावणीही झाली. त्या सुनावणीनंतर या कचरा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांच्याकडील स्वच्छता विभागाचा पदभार तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. हा पदभार आता रावण सोनसळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी काढले आहेत.

नांदेड शहरातील कचरा तुप्पा परिसरातील डम्पिंग ग्राउंडवरून कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर पडला जात होता. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले होते. कचरा वाहतूक प्रकरणात चोरीची कलमे वाढवून कंत्राटदार अशोक पाल व संबंधित सहायक आयुक्त गुलाम सादिक व अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करा, त्यांना सहआरोपी करा अशी मागणी नांदेड लोकन्याय विकास आघाडीच्या १४ नगरसेवकांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात केली होती. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजता कचऱ्याची वाहतूक करणारी दोन हायवा वाहने पकडण्यात आल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास व्यापक व निष्पक्ष पद्धतीने करून, चोरीसह लागू होणारी इतर फौजदारी कलमे वाढविण्यात यावीत, अशी मागणी नांदेड लोकन्याय विकास आघाडीच्या वतीने करण्यात होती.

या प्रकरणात संबंधित कंत्राटदार अशोक पाल, संबंधित सहायक आयुक्त गुलाम सादिक, स्वच्छता विभागप्रमुख आणि इतर जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासून, त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे आढळल्यास त्यांना सहआरोपी म्हणून समाविष्ट करावे, अशी मागणी पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली होती. कचरा कोणाच्या आदेशाने वाहून नेण्यात आला, वाहनांना परवानगी किंवा गेटपास कोणी दिला आणि या प्रक्रियेत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, याची तपासणी करावी, संबंधित कंत्राटदाराकडून एकाच कचऱ्याचे वारंवार वजन दाखविणे, खोट्या नोंदी करणे किंवा चुकीची देयके सादर करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक झाली आहे का? याची चौकशी करण्याची मागणी राहुल सोनसले, ॲड. शेख बिलाल, शेख उम्मे आयमन सय्यद रिजवान, सय्यद शोएब, मोहसिन खान, सुनीता रूपक जोंधळे, सत्यपाल सावंत, महजाबिन बेगम अब्दुल फहीम, परवीन बेगम शेख पाशा, शेख बाबू खोकेवाले, आफिया नाज नाफे काझी आणि मुन्ना अब्बास हुसेन, ज्योती रमेश गोडबोले, हलिमा बी शेख बाबू यांनी निवेदनातून केली होती.

गुन्हा दाखल होण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न..? नांदेड महापालिकेच्या तुप्पा डंपिंग ग्राउंडवरील कचरा प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून कचरा ठेकेदार अशोक पाल आणि स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती या संदर्भाने विभागीय आयुक्तांकडे ही तक्रार झाली सुनावणी ही झाली प्रकरणाचे गांभीर लक्षात घेता गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुलाम सादिक यांना पदावरून दूर करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्नही आता नांदेड लोकन्याय विकास आघाडीकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!