Police

नांदेडमध्ये सक्षम ताटेच्या खून प्रकरणात दोघांना मानवत येथून अटक; आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना पकडले

गोळ्या झाडूनच केला सक्षमचा खून, डोक्यात फरशीही घातली, मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेने केले जेरबंद 

नांदेड – जुन्या नांदेडात प्रेम प्रकरणातून गुरुवारी संघसेननगर येथील सक्षम गौतम ताटे याचा युवतीच्या कुटुंबीयांनी गोळ्या झाडून तसेच डोक्यात फरशी घालून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यातील दोन मुख्य सूत्रधारांना स्थानिक गुन्हा शाखेने परभणी जिल्ह्यातील मानवत येथून जेरबंद केले आहे. या प्रकरणाच्या तपासाची दिशा आता स्पष्ट झाली आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी सायंकाळी सक्षम गौतम ताटे या युवकाचा गजानन बालाजीराव मामीडवार वय ४५, साहिल मदनसिंह ठाकूर उर्फ साहिल गजानन मामीडवार वय २५ तसेच इतर आठ ते नऊ जणांनी एकत्र येऊन ‘ मुली सोबत का बोलतो या कारणावरून गोळ्या झाडून खून केला. घटनास्थळी गोळीबार झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले होते; मात्र हा गोळीबार कोणी केला होता हे पोलिसांनी उघड केले नव्हते. ही बाब आता शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाली आहे. आरोपितांनी सक्षमवर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी सक्षमच्या कमरेस लागली. त्यात तो जखमी झाल्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आला. यात तो जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचे गांभीर लक्षात घेता स्थानिक गुन्हा शाखेला आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनीही आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पथकातील अंमलदार असे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोपीचा नांदेड शहरात घेत असताना पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सदर गुन्ह्यातील दोघे फरार आरोपी हे गुन्हा करून परभणी जिल्ह्यातील मानवत येथे नातेवाईकाकडे गेल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच मानवत येथील गोलाईतनगर येथे गजानन बालाजी मामीडवार आणि साहिल मदनसिंह ठाकूर उर्फ साहिल गजानन मामीडवार या दोघांना पकडले. त्यांनी व इतर आरोपीतांनी संगणमत करून आणि कट रचून सक्षम ताटे याचा खून केल्याचे कबूल केले. या दोघांनाही स्थानिक गुन्हा शाखेने इतवारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे. दरम्यान, या प्रकरणात पाच जणांसह इतर चौघाविरुद्ध खून आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यात मुलीच्या आई वडिलांसह भावांचाही समावेश आहे.

नांदेड शहरात पिस्तुलांचा होणारा वापर हा आता चिंतेची बाब ठरली आहे. गुन्हेगारांकडे मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तूल असल्याचे गुरुवारी घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. त्यात तुरुंगातून बाहेर आलेले गुन्हेगार मोठ्या प्रमाणात शहरात गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून अशा अट्टल गुन्हेगारावर नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसातील गुन्हे पाहता हे तुरुंगातून बाहेर आलेल्या गुन्हेगारांनीच केल्याचे उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!