
नांदेड – गोकुंदा शासकीय विश्रामगृहात आदिवासी महिलेवरील अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब करणारे आणि तेलंगणा पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगार सोडवून नेल्याच्या घटनेनंतर चर्चेत आलेले किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची अखेर नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. किनवट ठाण्याचा पदभार आता नियंत्रण कक्षातील जगदीश मंडलवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तेलंगणा पोलिसांना हवा असलेला एक संशयित आरोपी तेलंगणा पोलिसांनी रविवारी सायंकाळी किनवटमधून ताब्यात घेतला होता. त्यानंतर त्याला तेलंगणामध्ये नेत असताना शेख जाफरच्या नातेवाईकांनी चिखली फाटा येथे तेलंगणा पोलिसावर थेट हल्ला चढविला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या संशयिताला हातकडीसह सोडवून नेले होते. वरिष्ठ पोलिसांच्या उपस्थितीनंतर पुन्हा त्या संशयित गुन्हेगाराला पकडून तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते; मात्र या प्रकरणात तेलंगणा पोलिसाला थेट गोळीबार करण्याची वेळ आली होती. तेलंगणा पोलिसांनी गोळीबार केला नसता तर त्यांच्या जीवावरही बेतले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे नांदेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विना क्रमांकाचे मोठ्या प्रमाणात पिवळे ऑटो किनवटमध्ये चालतात यातील बहुतांश ऑटो हे चोरीचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासणी करण्याचे काम स्थानिक पोलिसांचे असते मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप होता यातूनच गुन्हेगारी वाढत होती.
अनुसूचित जमातीला मिळणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या विधिमंडळाचजमाती कल्याण समिती नांदेडमध्ये असतानाच किनवटच्या गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात एका विधवा महिलेवर २० ऑगस्ट रोजी बालाजी केंद्रे याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. सलग दोन दिवस त्याने हा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर सदर महिला किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या असता तिथे त्या महिलेला एक दिवस चक्क बसवून ठेवण्यात आले. इतक्या गंभीर प्रकरणानंतरही त्या महिलेची तक्रार पहिल्या दिवशी घेण्यात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी किनवट ठाण्यात ही तक्रार घेण्यात आली. प्रारंभी तडजोड आणि त्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोपही या प्रकरणात करण्यात आला होता. अखेर स्थानिक आमदारांच्या कानउघडणीनंतर विनयभंगा सह ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एकूणच या दोन्हीही संवेदनशील प्रकरणानंतर किनवट ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड हे वरिष्ठांच्या नजरेत आले होते. अखेर त्यांच्या नियंत्रण कक्षाच्या कक्षातील रवानगीचे आदेश प्राप्त झाले आहेत. आता किनवटचे नवे ठाणेदार म्हणून जगदीश मंडलवार हे काम पाहणार आहेत.



