क्राईम

नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून युवकाचा खून..!

घटनास्थळी दोन गोळ्याही झाडल्या, फरशी घालून डोक्याची केली चाळणी 

नांदेड – जुन्या नांदेडातील मिलिंदनगर, पैलवान टी हाऊसजवळ एका तरुणाचा प्रेम प्रकरणातून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. घटनास्थळी गोळीबाराचाही प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र या गोळ्या मारेकऱ्याने झाडल्या की मयताकडून झाडल्या होत्या याबाबतही आता पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ,  स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी भेट देऊन माहिती घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सक्षम गौतम ताटे या तरुणाचे गेल्या काही दिवसापासून एका युवतीशी प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाबाबत मुलीचे वडील तसेच भाऊ यांनी सक्षम गौतम ताटे याला सूचनाही दिली होती. मात्र हे प्रेमसंबंध थांबत नसल्याने संतापलेल्या गजानन मामीडवार, साहिल गजानन मामीडवार, सोमेश सुभाष लाखे आणि अन्य दोघा तिघांनी गुरुवारी सायंकाळी सक्षम ताटे याला मिलिंदनगर येथे गाठले. तेथे तो प्रशिक ओढणेसोबत थांबलेला असताना त्याच्याशी याच कारणावरून मामीडवार कुटुंबातील दोघा तिघांनी वाद घातला. याच वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. सक्षम ताटे याच्या डोक्यात फरशी मारली. त्याचवेळी घटनास्थळी गोळीबारही झाला त्यात दोन राऊंड झाडल्याची माहिती पुढे आली आहे; मात्र नेमका हा गोळीबार कोणी केला याबाबत अजूनही स्पष्टता येऊ शकली नाही. या मारहाणीत सक्षम ताटे हा जागीच ठार झाला. घटनेनंतर मारेकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. भरवस्तीत घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे स्थानिक नागरिक मात्र प्रचंड भयभीत झाले होते.
घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात सखोल चौकशी केली जात आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्यासह इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात मयताची आई संगीता गौतम ताटे यांनी हा खून जातीय भावनेतून झाल्याची तक्रार इतवारा पोलिसांकडे केली आहे. जातीय भावनेतूनच सक्षम ताटे  याचा खून केल्याचे म्हटले आहे. सक्षम ताटेचे गेल्या काही दिवसापासून गजानन मामीडवार यांच्या मुलीशी प्रेम संबंध होते. यातून अनेकदा वादही झाला तसेच मुलीच्या आई-वडील व दोन भावांनी मिळून सक्षमला धमकीही दिली होती. आमच्या मुलीला बोलणे सोडले नाही तर तुला जीवे मारू अशी धमकीही दिली होती, अशी तक्रार मयताच्या आईने केली आहे. आज २७ नोव्हेंबर रोजीही गजानन मामीडवार, साहिल गजानन मामीडवार, हिमेश गजानन मामीडवार आणि इतर चार ते पाच जणांनी घरी येऊन धमकी दिली होती आणि या प्रकारानंतर अर्ध्या तासातच खुनाचा हा प्रकार घडल्याचेही सक्षम ताटेची आई संगीता गौतम ताटे यांनी इतवारा पोलिसांकडे दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.

मयतावर आहेत अनेक गुन्हे दाखल; ८ दिवसांपूर्वीच जेलमधून आला होता बाहेर … मयत सक्षम ताटे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.  त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एमपीडीएचीही कारवाई केली आहे. तो या कारवाईतन गेल्या आठ दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. बाहेर येताच त्याचा असा निर्घृण खून झाला आहे. या घटनेतील मारेकऱ्यांविरुद्धही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची माहिती घेतली जात असल्याचे इतवारा पोलिसांनी सांगितले.  एकूणच खून आणि गोळीबाराच्या या घटनेमुळे जुन्या नांदेडात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!