Police

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन ॲक्शन मोडवर..!

खुद्द रस्त्यावर उतरून घेतली माहिती, कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच केल्या बदल्या, दोन पोलीस निरीक्षकांना तर चार महिन्यातच इतरत्र हलवले, नांदेड शहरातील काही ठाणे प्रमुखांनाही लवकरच मिळणार निरोप..!

नांदेड – श्री विसर्जन काळात इतवारासारख्या संवेदनशील ठाण्यातून प्रमुखाला हलविण्यात आल्याची बाब स्मरणातून गेली नसतानाच आता आणखी दोन पोलीस निरीक्षकांची अवघ्या चार महिन्यातच बदली करून पोलीस अधीक्षक डॉ . निलाभ रोहन यांनी पुन्हा एकदा जिल्ह्याचा कारभार आपल्याच पद्धतीने चालविण्यात येईल, हे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी सोमवारी नांदेड शहरात घडलेल्या तरुणीवरील हल्ल्यानंतर ते स्वतः बुधवारी भाग्यनगर रस्त्यावर उतरले. परिसरात त्यांनी पाहणी करून काही कोचिंग क्लासेसला भेटी देऊन विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी आज बुधवारी जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये नायगाव पोलीस ठाण्याचे अमोल हरिदास भगत यांना नायगावहून अर्धापूर येथे तर अर्धापूरचे पोलीस निरीक्षक महादेव हनुमंतराव मांजरमकर यांना विमानतळ सुरक्षा विभागात अवघ्या चार महिन्यात हलविण्यात आले आहे. बहुचर्चित नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे ओमकांत आनंदराव चिंचोलकर यांची बदलीही आता नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील अशोक तुकाराम जाधव यांना नांदेड ग्रामीण ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. अमरावतीहून आलेल्या जाधव यांची थेट ग्रामीण ठाण्यातील नियुक्तीही विशेष बाब मानली जात आहे. नांदेड विमानतळ सुरक्षा विभाग सांभाळणाऱ्या सुभाष पांडुरंग उन्हाळे यांना नायगाव पोलीस ठाण्याचा पदभार सोपविला आहे. इतवारा ठाण्यापाठोपाठ नांदेड ग्रामीण, अर्धापूर, नायगाव येथील ठाणे प्रमुखांच्या बदलीनंतर आता नांदेड शहरातील काही ठाणे प्रमुखही बदलले जाणार असल्याची चर्चा पुढे आली आहे. शहरातील काही ठाणेकरांना लवकरच निरोप दिला जाईल, असे सांगितले जात आहे.

या बदल्यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची प्रतिक्रिया घेतली असता या सर्व बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी केवळ चार महिन्यात झालेल्या बदलाबाबत विचारले असता त्या बदल्याही प्रशासकीय असल्याचे सांगितले. ठाणे प्रमुखांच्या तक्रारी संदर्भात त्यांनी ‘तसे काही नाही’ असे स्पष्ट केले.

शहरात सोमवारी भाग्यनगर रस्त्यावर तरुणीवर हल्ल्याची घटना घडली. या घटनेनंतर शैक्षणिक संकुल परिसरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली होती. या संदर्भात आता खुद्द पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन हे रस्त्यावर उतरले असल्याची बाब बुधवारी स्पष्ट झाली. त्यांनी प्रारंभी शिवाजीनगरातील कोनाळे कोचिंग क्लासेस येथे सर्व प्रमुख कोचिंग क्लासेस चालकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोचिंग क्लासेस चालकांकडून सुरक्षा संदर्भातील उपाययोजना आणि त्यांच्या सूचना जाणून घेतल्या तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधून आपल्या अडचणी आम्हाला सांगा असे आवाहन केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, जनसंपर्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

भाग्यनगर मुख्य रस्त्यावर पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पायी फिरून या परिसरात पाहणी केली. येथील आयआयबी या क्लासेसलाही त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी क्लासेसच्या काही विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी पोलीस अधीक्षकांपुढे मांडल्या. या तक्रारीची निश्चितपणे दखल घेतली जाईल आणि त्या तात्काळ सोडविल्या जातील, असे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक संकुल परिसरातील पोलीस पेट्रोलिंग वाढविली जाईल प्रत्येक क्लासेसमध्ये आता स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्यात येईल. त्याचवेळी नव्या पथकांचीही या भागात नियुक्ती केली जाईल, असे ते म्हणाले. यासोबतच गुन्हेगारांसह दारुड्यावरही पोलिसांची नजर राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!