
नांदेड – नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावामध्ये आज ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:२५ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर याबाबत तपासणी केली. दुपारी ३: २६ वाजता या धक्क्याची नोंद झाली. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.० इतकी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील खपराळ गावाजवळ आहे. सदर धक्का हा अतिसौम्य प्रकारचा आहे तसेच या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी सांगितले.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्टने फिट करून घ्यावीत. भूगर्भातून आवाज आलाच तर घराबाहेर मोकळ्या जागेत जावे व प्रशासनाला 02462- 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.



