
नांदेड – काँग्रेसचे नांदेडमधील खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार असल्याबाबत सोशल मीडियामध्ये गेल्या काही दिवसापासून वावड्या उठल्या आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांना विचारले असता त्यांनी राजकारणात काहीही घडू शकते, राजकारणात काहीही अशक्य नाही असे म्हणून पुन्हा एकदा काँग्रेसचे खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांच्याविषयी निर्माण झालेल्या संभ्रमात आणखी वाढ केली आहे.
नांदेडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रा. रवींद्र चव्हाण यांची भूमिका नेहमीच मवाळ राहिली आहे. भारतीय जनता पक्ष तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याबाबत बोलताना ते नेहमीच तोलून मापून आणि सांभाळून बोलत होते. निवडणूक काळातही त्यांनी भाजपावर केलेल्या टीकेची धार बोथट अशीच होती. नांदेडमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी उचललेली पावलेही नांदेडमध्ये भाजपला बळकटी देणारेच ठरले आहेत. खासदार म्हणून काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी प्रा. रवींद्र चव्हाण हे अपयशीच ठरले असल्याचे जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका व महापालिका निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पक्षात एककल्ली कारभार करण्यासाठी ते चर्चेत आले आहेत. खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. असे असले तरीही त्यांनी आपल्या भूमिकेत मात्र कोणताही बदल केला नाही.
या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेतील काँग्रेसची सत्ता २५ वर्षानंतर भाजपाकडे गेली आहे. नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या विषयीचा संशय आणखी बळावला. त्यात गेल्या आठ दिवसापासून सोशल मीडियावर त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या पोस्टही मोठ्या प्रमाणात प्रश्नार्थक चिन्ह देऊन पसरविल्या जात होत्या. सोशल मीडियावरील या चर्चेचा काँग्रेसचे खासदार चव्हाण यांनी खुलासा केला. आपण काँग्रेसमध्येच राहणार असून राहुल गांधीचे सैनिक असल्याचा उल्लेख केला. त्याचवेळी सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेबाबतही त्यांनी जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलकडे एक तक्रारही दाखल केली आहे.
नांदेड महापालिकेत आज सोमवारी भाजपाच्या महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यानंतर माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाविषयी विचारले असता माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, राजकारणात काहीही अशक्य नाही, असे सांगून पुन्हा एकदा संशयकल्लोळ वाढविला आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी राजकीय उत्तर देत या प्रश्नाला बगल दिली; परंतु त्यांच्या दोन वाक्यानेच काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्याविषयी पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे. त्याचवेळी हदगावचे एक माजी आमदारही भाजप प्रवेशाच्या चर्चेत आहेत. त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही आता शोधला जात असल्याचे सांगितले जात आहे. या माजी आमदाराच्या भाजपा नेत्यांसोबतच्या बैठका सातत्याने वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेश मात्र निश्चित मानला जात आहे.



