भौगोलिक

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

भूकंपाची तीव्रता वाढली, ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, वसमत तालुक्यातील शिरली गावच्या उत्तरेस केंद्रबिंदू

नांदेड – नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी सकाळी ८.४५ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा, नायगाव तालुक्यातील अनेक गावात हे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावरही या धक्क्यांची नोंद झाली आहे.  धक्का जाणवताच नांदेड शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. हा भूकंप ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावच्या उत्तरेस येथे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात यापूर्वी मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावामध्ये ११ फेब्रुवारी २०२५ रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्याचवेळी भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे १९ आणि २० सप्टेंबर रोजी २०२५ रोजी भूकंप झाला. नायगाव तालुक्यातही १२ ऑक्टोबर २०२५ रोजी टाकळी बु. येथे भूगर्भातून आवाज आले होते.

नागरिकांनी या काळात खबरदारी घेण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्टने फिट करून घ्यावीत. भूगर्भातून आवाज आलाच तर घराबाहेर मोकळ्या जागेत जावे व प्रशासनाला 02462- 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

भूकंपाची तीव्रता वाढली..! नांदेड शहर, अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यात २१ मार्च २०२४ रोजी सकाळी ६:०९ व ६:१९ मिनिटांनी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.५ व ३.६ अशी नोंदविण्यात आलेली आहे. त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात होता. नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले होते. १९९३ नंतर सर्वाधिक ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप २१ मार्च २०२४ झाला होता. आता  आज ११ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे भूकंपाची वाढती तीव्रता चिंतेची बाब ठरणार आहे.

.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!