
नांदेड – मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा आज बुधवारी सकाळी सव्वा सात वाजेदरम्यान भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळीच बसलेल्या या धक्क्यामुळे अनेक जण घराबाहेर पडले. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. पाच रिश्टर स्केलच्या पुढच्या तीव्रतेचे भूकंप हे धोकादायक मानले जातात. त्यात नांदेड जिल्ह्यातील भूकंपाची तीव्रता आता ४.५ रिश्टर स्केलपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आता नागरिकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रशासकीय पातळीवरूनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. भूकंपापासून बचावाबाबतची जनजागृती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नांदेडमधील भूकंपाची तीव्रता सौम्य स्वरूपाची असली तरीही नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नांदेड शहर व परिसरात नागरिक सकाळच्या लगबगीत असतानाच भूगर्भातून अचानक आवाज आणि भूकंपाचे सौम्य स्वरूपातील धक्के सर्वांनाच जाणवले. हा भूकंप असल्याची जाणीव होताच अनेक नागरिक भीतीने घराबाहेर पडले.
नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी ७:१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
२१ मार्च २०२४ रोजी जाणवले होते भूकंपाचे तीन धक्के…नांदेड शहर आणि परिसरात २१ मार्च २०२४ रोजीही सकाळीच असेच भूकंपाचे धक्के जाणवले. होते २१ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ०८ मिनिट, ६ वाजून १९ मिनिट आणि ६ वाजून २४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते मागील भूकंपाची तीव्रताही ४.५ रिश्टर स्केल इतकीच होती.