
नांदेड – धर्माबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास फोनद्वारे पाच हजार रुपयांची खंडणी मागून खंडणी न दिल्यास गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ६ जून रोजी घडला आहे. धर्माबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेने धमकी देणाऱ्या एका युवकास अटक केली असून इतर दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्माबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले हनुमंत रावसाहेब नरवाडे यांना शनिवारी अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. ही खंडणी न दिल्यास गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकीही त्यांना देण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीवरून धर्माबाद पोलिसात ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी तांत्रिक पुराव्या आधारे तसेच गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील बळीरामपूर सुनीलनगर येथून पांडुरंग तोलबा वन्ने रा. वाका ता. लोहा हल्ली मुक्काम सुनीलनगर याला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याने देविदास गणेश गायकवाड रा. जवाहरनगर तुप्पा आणि अशोक वाघमारे रा. एकलारा ता. मुखेड यांच्यासह संगनमत करून सदरचा गुन्हा केला असल्याचा कबुली जबाब दिला आहे. या प्रकरणात त्याने वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी आरोपी पांडुरंग वन्ने याला धर्माबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे, बळीराम दासरे, पोकॉ देविदास चव्हाण, मोतीराम पवार, महेश बडगु, सिद्धार्थ सोनसळे, सायबर सेलचे पोहेकॉ राजू सिटीकर, दीपक ओढणे यांनी केली आहे.



