
नांदेड – शहरातील वजीराबाद ठाणे हद्दीतील खडकपुरा वाघी रस्त्यावर महापालिकेच्या जेसीबी चालकाला जमावाने मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणात पोलीस विभागाने महापालिकेकडून हे अतिक्रमण काढताना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती अथवा मदत मागितली नव्हती, असा खुलासा वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.एन. घोडके यांनी केला आहे. त्यामुळे या संयुक्त मोहिमेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नांदेड शहरात गेल्या काही दिवसापासून महापालिका आणि पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेत अतिक्रमण हटविल्यानंतर अधिकाऱ्यांचे फोटो सेशन असलेले छायाचित्र, व्हिडिओ माध्यमांना पाठविण्यात येत होते. मोठी प्रसिद्धी मिळवली जात होती. दुसरीकडे याच कारवाईबाबत सामान्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. मोठमोठ्या इमारतीपुढे असलेले अतिक्रमण न हटविता सामान्य नागरिकांचे गाडे हटविण्याचे काम महापालिका आणि पोलीस दल करत असल्याचा आरोप सामान्य नागरिक, हातावर पोट असलेल्या महिला अगदी टाहो फोडून करत होते. गरिबांच्या लाखो रुपयांच्या साहित्याची नासधूस पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. त्यावेळी कोणताही खुलासा करण्यात आला नाही; मात्र खडकपुरा भागात घडलेल्या अनुचित घटनेनंतर आता पोलिसांनी शहरातील अतिक्रमण मोहिमेबाबत हात वर केले आहेत.
महापालिकेने सोमवारी करण्यात येणाऱ्या अतिक्रमण मोहिमेबाबत कोणतीही माहिती आम्हाला दिली नाही कोणताही पत्रव्यवहार केला नाही असा स्पष्ट खुलासा वजीराबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. एन. घोडके यांनी ‘नांदेड स्क्रिप्ट’ कडे केला आहे. खडकपुरा प्रकरणात गुन्हा दाखल केला जात असल्याचेही घोडके यांनी स्पष्ट केले आहे लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.



