Police

नांदेड महापालिकेच्या इतिहासात खडकपुरा भागात पहिल्यांदाच अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी..!

उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांची कणखर भूमिका, मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांना दाखविला पोलिसी खाक्या, पोलिसांचाही होता मोठा फौजफाटा

नांदेड : शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी मागील काही दिवसांपासून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यावतीने संयुक्तपणे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. ४ मे रोजी रोजी खडकपुरा वाघी रोड येथे जमावाने महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला. त्यानंतर मंगळवारी महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी कणखर भूमिका घेत महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच खडकपुरा भागात अतिक्रमण मोहीम यशस्वीरित्या राबवित मुख्य रस्त्यावरील जवळपास ५० ते ६० अतिक्रमणे जमीनदोस्त केली. या कारवाईत पोलिसांनीही खमक्या भूमिका घेत पोलिसी खाक्या काय असतो ते दाखवून दिला.
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील मुख्य रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवली जात आहे. ४ मे रोजी अतिक्रमण विभागाचे पथक कलामंदिर ते मिल रोड व त्यानंतर खडकपुरा भागात कारवाई करत असताना, खडकपुरा वाघी रोड येथील जमावातील काही व्यक्तींनी पथकातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले, ज्यात मनपा कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे यांनी वजिराबाद तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनेतील आरोपी मोहम्मद अतिक मोहम्मद खलील, शेख आयान शेख हबीब, उमरखान सत्तार खान व इतर तीन व्यक्ती  सर्व रा.खडकपुरा नांदेड यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण व शिवीगाळ करणे, धमकावणे इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी नांदेड महापालिका आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्ण तयारीनिशी खडकपुरा भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचा निर्णय करण्यात आला आणि तो अंमलातही आणला. सदरील कारवाई आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत वजिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एन. घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, पोहेकॉ शेख, शहर वाहतुक शाखेचे भागवत नागरगोजे, रवि घाडगे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, फरहतुल्ला बेग, अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर, विशाल सोनकांबळे यांच्यासह महापालिकेचे ३० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील २० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या मोहिमेत मुख्य रस्त्यावर जवळपास १५ फूट पुढे करण्यात आलेले अतिक्रमणे महापालिकेने हटवले आहेत.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले, शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांनी केले आहे.

महापालिकेने यापूर्वी खडकपुरा भागात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यात यश आले नव्हते. दोन वर्षापूर्वी महापालिकेचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी त्यानंतर गतवर्षी वजीराबाद क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी गौतम कवडे आणि काल सोमवारी जेसीबी चालकाला गंभीर मारहाण करण्यात आली होती. एकूणच या भागातील वातावरण लक्षात घेता महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी कणखर भूमिका घेत या भागातील अतिक्रमण हटविण्यात येणारच, असा पवित्र घेतला.  पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनीही मोठा फौज फाटा या मोहिमेसाठी मंगळवारी पुरवला. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर कही राजकीय पक्षांनीही या प्रकरणात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला महापालिका आणि नांदेड पोलिसांनी जुमानले नाही हे मंगळवारी झालेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या भागात अतिक्रमण हटाव मोहीम फते झाली आहे हे विशेष..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!