
नांदेड – नांदेड विधान परिषदेच्या मतदानासाठी एक दिवस उरला असताना राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना शिंदे गटात गेले आहेत. त्याचवेळी त्यांचे पुत्र तसेच नांदेड विधान परिषद निवडणूक उमेदवार असलेले कृष्णा पाटील आष्टीकर यांनी मात्र आपण आजही महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांचीही भूमिका आणखी संदिग्ध अशीच आहे. आम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नांदेड विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणातून मागे घेतला. अपक्ष उमेदवार कृष्णा पाटील यांना पाठिंबा दिला. मतदानाच्या एक दिवस आधीच कृष्णा पाटील आष्टीकर यांचे वडिल खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नांदेडचे विधान परिषद निवडणुकीचे संपूर्ण गणितच बिघडले आहे. काँग्रेसने टाकलेले सर्व राजकीय डावपेच त्यांच्यावरच उलटले आहे. एकीकडे काँग्रेसची ही परिस्थिती झाली असताना उमेदवार कृष्णा पाटील यांनी मात्र आपण आजही महाविकास आघाडीचे आहोत, होतो आणि राहणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक असल्याची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेला सोशल मीडियावर ठाकरी शैलीतच उत्तर दिले जात आहे. वडिल कुठे आहेत, वडिलांच्या गद्दारीवर बोला, आपला काय भरोसा आता अशा अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्टवर येत आहे. त्यांनी केलेला खुलासा हा मान्य करण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसत आहे.
या सर्व घडामोडीत वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी मात्र आपली उमेदवारी मागे न घेण्याची ठाम भूमिका घेतली होती. ती भूमिका आज योग्य होती असे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचा उमेदवार असता तर आपण उमेदवारी मागे घेतली असती असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता वेळ आहे ती काँग्रेसची. काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नांदेडच्या खासदारांची सुरुवातीपासूनची असलेली भूमिका ही संदिग्धच असल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसची भूमिका सायंकाळपर्यंत पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



