
नांदेड – विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हैदराबादमार्गे दिल्ली गाठल्याची माहिती पुढे येत आहे. आता नांदेड विधान परिषद निवडणुकीत त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर रिंगणात आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवार हा ठाकरे गटाचा नसून शिंदे गटाचा होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानात काँग्रेसची नेमकी भूमिका काय राहणार? हा प्रश्न पुढे आला आहे. त्याचवेळी ऑपरेशन टायगर फियगर काहीही नाही असे म्हणणारे खा. आष्टीकर निवडणूक सोडून दिल्लीत पोहोचले आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचेही नाव प्रारंभापासून चर्चेत आहे. मंगळवारी रात्री उशिरा ते हैदराबादमार्गे दिल्लीत पोहोचले असल्याचेही सांगितले जात आहे. विधान परिषद निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसने स्वतःचा उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचा अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेऊन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील यांना पाठिंबा दिला. यात नांदेडचे काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांची भूमिका महत्वपूर्ण होती. सुमठाणकर यांनी काँग्रेस पक्षाच्या अर्ज माघारी घेण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी मागे का घेतली? ठाकरे गटाचे खासदार आष्टीकर हे पहिल्या दिवसापासून संशयाच्या भोवऱ्यात असतानाही त्यांच्या मागे जाणे हे काँग्रेसला आता महागात पडले आहे; पण त्याचवेळी हा संपूर्ण डाव नियोजित होता का असा प्रश्नही आता काँग्रेसमधूनच विचारला जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले हेही मैदानात आहेत. नांदेडमध्ये काँग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीत माघार घेतली असली तरी वंचितचे उमेदवार इंगोले यांनी माघार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता रिंगणात असलेल्या इंगोले यांच्या मागे काँग्रेस मतदार राहतील का हा प्रश्न पुढे आला आहे. उद्या गुरुवारी विधान परिषद निवडणुकीत मतदान होणार आहे. या सर्व घडामोडीत भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांची बाजू मात्र आणखी भक्कम झाली आहे.
नांदेड विधान परिषद निवडणूक ‘मॅनेज’च…नांदेड विधान परिषद निवडणूक ही संपूर्णतः मॅनेज असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते खा. श्रीकांत शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आले असताना नांदेडमधील एका हॉटेलमध्ये त्यांची खास नांदेडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समवेत एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीतच संपूर्ण डाव ठरला असल्याचेही आता उघड होत आहे. ऐनवेळी ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या चिरंजीवाला दिलेला काँग्रेसकडून पाठिंबा ही बाबही या डावाचा एक भाग होता काय असा प्रश्न होता पुढे आला आहे. नांदेडचे काँग्रेसचे खासदार प्रारंभी पासूनच भाजपाला अनुकूल अशी भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. आता त्या टीकेला पाठबळच मिळाले आहे. आष्टीकर हे शिंदे गटात जातील अशा घडामोडी सुरू असताना विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने घेतलेली भूमिका आता मॅनेज असल्याचेच बोलले जात आहे. त्यातही काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांची भूमिकाही पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.



