राजकीय

…अखेर रामदास पाटील सुमठाणकर यांनी काँग्रेस नेतृत्वाला विचारला प्रश्न..!

अर्ध्या तासात अस काय घडलं..? १०७ जागा असताना १३ जागा असलेल्या 'उबाठा' ला दिली जागा, उमेदवार शोधात काँग्रेसकडूनच सुमठाणकरांना घातली होती गळ 

नांदेड – नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी घोषित केलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांना अखेर शेवटच्या क्षणी माघार घ्यावी लागली. प्रारंभी पक्ष आदेश आणि जिल्ह्याचे दमदार काँग्रेस खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसारच आपण काम करत आहोत, त्यांच्या आदेशानुसार माघार घेतली असे ठामपणे सांगणाऱ्या रामदास पाटील यांनी अखेर नेतृत्वाला समाज माध्यमाद्वारे प्रश्न विचारताना १०७ जागा असतानाही १७ जागा असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला ही जागा का सोडली..? त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. समाज माध्यमावर त्यांनी वेगवेगळ्या पोस्टद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रामदास पाटील सुमठाणकर यांना काँग्रेसने एबी फॉर्म देत उमेदवारी दाखल करायला लावली. सुमठाणकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध नगरपालिका सदस्यांच्या बैठका घेत तयारी केली होती. महापालिकेच्या नगरसेवकाशी त्यांनी संवाद साधला होता. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना तिकीट निश्चित करण्यात आले. त्याचवेळी काँग्रेसकडूनही त्यांनी उमेदवारी भरावी यासाठी पाठपुरावा केला जात होता. असे असताना गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणाला त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी आपली उमेदवारी मागेही घेतली. सायंकाळपर्यंत त्यांनी पक्ष आदेश आपल्यासाठी अंतिम असेल, असेही स्पष्ट केले होते. त्यांनी जिल्ह्याचे खा. रवींद्र पाटील यांच्या आदेशाप्रमाणे आपण काम करू, असे हे स्पष्ट केले होते.
कार्यकर्ते आणि नेत्यांच्या गर्दीतून बाहेर पडल्यानंतर एकट्यामध्ये मनातील द्वंद्वाला सामोरे जावे लागले. या मानसिक द्वंद्वात अखेर त्यांनी सत्य मांडलेच. गुरुवारी रात्री आपल्या समाज माध्यमाद्वारे मनातील भावना व्यक्त केल्या. विधान परिषद निवडणुकीच्या युद्धाची तयारी तर  संपूर्ण झाली होती मात्र आपण तहात हरलो अशी भूमिका मांडली. त्याचवेळी हा तह कशाच्या आधारे केला हा प्रश्नही त्यांना सतावत आहे. काँग्रेसच्या ९२ आणि इतर १७ सदस्य असे बलाबल असतानाही केवळ १३ जागा असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सोडण्यात आली. यामागे नेमके काय गणित होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राजकारणातील एक भयाण वास्तवही त्यांनी आपल्या समाज माध्यमावरील पोस्टद्वारे मांडले होते; मात्र काही प्रतिक्रिया पाहता त्यांनी ती पोस्ट काही वेळातच डिलीट केली. सुमठाणकर यांनी मांडलेल्या वेगवेगळ्या भूमिकेला समर्थकांनी प्रतिसाद देताना एक योद्धा म्हणून त्यांचा गौरव केला आहे. राजकारणात आगामी काळात मोठे यश मिळेल असा आशावादही व्यक्त केला आहे.

काँग्रेस खासदाराची बोटचेपी भूमिका..? नांदेडमध्ये सामान्य नागरिकांनी मोठ्या विश्वासाने खासदार म्हणून निवडून दिलेल्या प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेबद्दल प्रारंभापासूनच वेगवेगळ्या शंका घेतल्या जात आहेत. या शंका त्यांच्या कृतीतून नेहमीच खऱ्या ठरत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे, निरीक्षक म्हणून कोणतीही भूमिका पार न पाडता केवळ तडजोडीचे राजकारण करणे, त्यातही काँग्रेस कार्यकर्त्याचे खच्चीकरण होईल अशीच भूमिका घेत निर्णय घेणाऱ्या खा. प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध काँग्रेसमध्येच आता मोठी नाराजी व्यक्त होत आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस मतदारांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असतानाही आपल्या पक्षाचा उमेदवार न ठेवणे यात नांदेडच्या खासदारांनी काय काय साध्य केले अशी चर्चा आता पुढे येत आहे. त्यात हिंगोलीच्या खासदाराबाबतही निवडून आल्यापासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!