
नांदेड – पेट्रोल पंपावर येऊन पेट्रोलची विचारपूस केली असता दुसऱ्याला विचारा असे म्हणणाऱ्या एका प्लंबरचा दोघाजणांनी लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याची गंभीर घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथे सुमित पेट्रोल पंप येथे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना सोनखेड पोलिसांनी रात्रभराच्या शोध मोहिमेनंतर नांदेडमध्ये रेल्वे स्थानक परिसरात जेरबंद केले आहे. या शोध मोहिमेत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सोनखेड पोलिसांसह लोहा पोलीस नांदेड ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेची मदत घेण्यात आली होती.
नांदेड शहरातील पीरबुऱ्हाण नगर येथील किफायत आली खाजा मोईनुद्दीन हे प्लंबर म्हणून काम करतात. १० जून रोजी सोनखेड येथे मोरगे पेट्रोल पंपावर ते काम करत होते. दुपारी चार वाजता एमएच १४ सीटी ७२४५ क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी पेट्रोल आहे का असे त्यांना विचारले. त्यावेळी आम्ही येथे प्लंबिंगचे काम करतो. आम्हाला पेट्रोल आहे का नाही याची माहिती नाही, तुम्ही आत जाऊन विचारा असे त्यांनी सांगितले. त्यावेळी बालाजी शिवाजी मोरे आणि त्याच्यासोबत असलेला पवन चौधरी याने पेट्रोल नाही असे का म्हणालास म्हणून मोहम्मद अस्लम मोहम्मद उस्मान, शेख जानी शेख गुलाब यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी किफायत अली हे हा वाद सोडवण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी त्यांनी किफायात अली यांनाही लाथा बुक्क्यांनी, रॉडने मारहाण केली. या मारहाणीत किफायत अली यांच्या डोक्यावर जबर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी बालाजी शिवाजी मोरे आणि पवन चौधरी हे दोघेही फरार झाले होते.
घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींची माहिती घेतली. त्यांचा शोध सुरू केला. त्यांच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली. त्याचवेळी कंट्रोल रूमलाही माहिती मिळाल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस, लोहा पोलीस, स्थानिक गुन्हे शाखाही या खून प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी कामाला लागली. सोनखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी रात्रभर या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी लोहा, पालम, गंगाखेड, परभणी आदी वेगवेगळ्या ठिकाणावर सर्च ऑपरेशन केले. अगदी शेतातील अनेक आखाडेही शोधून काढले. तांत्रिक मदतीने ही आरोपींचा शोध घेतला जात होता. आरोपी आपले स्थान बदलत होते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात वेळ लागत होता. अखेर गुरुवारी सकाळी बालाजी मोरे आणि पवन चौधरी हे दोघे नांदेड रेल्वे स्थानक परिसरात असल्याची पक्की खबर सहायक पोलीस निरीक्षक नागरगोजे यांना मिळाली. त्यांनी याबाबत स्थानिक गुन्हा शाखेला अवगत केले. या माहितीनंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तातडीने रेल्वेस्थानक परिसरात पोहोचले. त्याच दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक नागरगोजेही तेथे पोहोचले. स्थानिक गुन्हा शाखेने दोघांनाही ताब्यात घेतले होते.
या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दारासिंग राठोड, पोहेकॉ. मोहन हाके, सुनील गटलेवार, मिलिंद नरबाग, ज्ञानोबा कवठेकर, प्रमोद जोंधळे, बालाजी कदम, संदीप घोगरे, इमरान शेख, माधव माने, श्रीराम दासरे, मनोज राठोड, लहू चाटे, आबासाहेब पिंगलवाड, विश्वनाथ पवार, धमानंद जाधव, सुधाकर देवकते, अमोल घेवारे, मारुती मुंडे, राजीव बोधगिरे, गोविंद राठोड, साहेबराव कदम, गणेश यादव, राजू सिटीकर दीपक ओढणे, महेश बडगु, सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर तिडके यांनी परिश्रम घेतले.
या घटनेतील मयत आणि आरोपी हे वेगवेगळ्या जातीचे असल्याने घटनेनंतर सामाजिक परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या प्रकरणावर स्वतः विशेष लक्ष ठेवले होते. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी पोलिसांना आदेशित करून तपासासाठी मार्गदर्शन केले. त्याचवेळी सोनखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी आरोपीच्या संपर्कातील एका व्यक्तीला तातडीने ताब्यात घेऊन त्याच्याशी संवाद कायम ठेवला आणि त्याच आधारे आरोपींना जेरबंद करण्यात यश आले. घटनेतील आरोपी तात्काळ पकडण्यात आल्याने दोन समाजातील दुरावा टाळण्यात यश आले. या घटनेनंतर समाज माध्यमावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ही बाब पाहता पोलिसांनी अगदी सतर्कतेने सामूहिक प्रयत्नांनी आरोपीला पकडले. सोनखेड पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांचीही पहिल्याच गुन्ह्यातील तपासाची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय ठरली आहे.



