क्राईम

सोनखेड पोलिसांचा वाळू माफियांना दणका..!

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ४ हायवा ट्रक पकडल्या, कारवाईत १ कोटी ८१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त 

नांदेड – लोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. पावसाळ्याच्या तोंडावर आता या अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी आपला वेग वाढविला आहे. सोनखेड ठाणे हद्दीत दगडगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे ४ हायवा ट्रक सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पकडले आहेत. याप्रकरणी वेगवेगळे ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तब्बल १ कोटी ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती नागरगोजे यांनी दिली.

नागरगोजे यांनी सोनखेड पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच हाती घेतला आहे. गुरुवारी रात्री दगडगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच नागरगोजे यांनी सहकाऱ्यांसह तेथे धाड टाकली. यावेळी चार हायवा ट्रक पकडण्यात आल्या आहेत. सोनखेड ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत १ कोटी ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा अवैध वाळू उपसा रोखण्यात आणि कारवाईसाठी महसूल विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. एकीकडे पर्यावरण रक्षणाचे धडे देणारे वरिष्ठ महसूल अधिकारीही मूग गिळून का गप्प आहेत याचाही उलगडा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांकडूनही कुठे कारवाई केली जाते तर कुठे अभय. अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यावरणाची मात्र ऐशी की तैशी होत आहे हे मात्र खरे..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!