क्राईम

नांदेडमध्ये राजकीय पक्षाशी संबंधित महिलेच्या घरातील अनैतिक व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांची धाड

जुन्या नांदेडातील होळी सराफा भागात चंद्रकांत प्लाझामध्ये सुरू होता अनैतिक व्यवसाय, एका पिडित महिलेची पोलिसांनी केली सुटका, महिलेसह मुलावरही गुन्हा दाखल

नांदेड – नांदेडमध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधित महिलेच्या घरामध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसाय अड्ड्यावर धाड टाकून एका पिडित महिलेची सुटका करण्यात आली. नांदेड शहरातील होळी सराफा भागात असलेल्या चंद्रकांत प्लाझा येथे ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या २२ ऑक्टोबर रोजी केली. या कारवाईत पोलिसांनी दिपाली किशोर उदावंत आणि नितीन किशोर उदावंत या दोघांना अटक केली आहे.

इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांना मिळालेल्या गोष्ट माहितीनुसार नांदेड शहरातील होळी सराफा भागातील चंद्रकांत प्लाझा येथे अवैध्य वेश्या व्यवसाय सुरू होता. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सापळा रचला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या या कारवाईत दोन शासकीय पंच आणि एका बोगस ग्राहकाची नियुक्ती करून छापापूर्व पंचनामा करण्यात आला. बोगस ग्राहकाकडे पाचशे रुपयांच्या दोन नोटा देऊन त्यास पंचासोबत चंद्रकांत प्लाझा येथील घरात पाठविण्यात आले. बोगस गिऱ्हाईकाने ठरल्याप्रमाणे सायंकाळच्या सुमारास पोलीस अंमलदारांच्या मोबाईलवर मिस कॉल देऊन इशारा करताच पोलिसांनी तेथे धाड टाकली. त्यावेळी तिथे एक ३३ वर्षीय पीडित महिला सापडली. तिची विचारपूस केली असता तिने दिपाली किशोर उदावंत वय ५१ वर्ष, रा. चंद्रकांत प्लाझा होळी सराफा आणि नितीन किशोर उदावंत वय ३० रा. चंद्रकांत प्लाझा होळी हे पीडित महिलेला जास्त पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. नितीन उदावंत हा ग्राहक आणण्याचे काम करत असे तर दिपाली उदावंत व नितीन हे ग्राहकाकडून पैसे स्वीकारून त्यातील अर्धी-अर्धी रक्कम स्वतःकडे ठेवून घेत असत. पोलिसांनी घराची झडती घेऊन रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला एका राजकीय पक्षातही कार्यरत होती.

या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार, ज्ञानोबा कवठेकर तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, अच्युत मोरे, दीपा कोकाटे यांनी पार पाडली.

दरम्यान, शहरात कुठेही अनैतिक मानवी व्यापार वेश्या व्यवसायासाठी महिलांचे शोषण किंवा अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी त्याची माहिती नांदेड पोलिसांना तात्काळ द्यावी किंवा डायल 112 वर माहिती द्यावी असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!