
नांदेड – केवळ १० हजार रुपयांसाठी मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकऱ्याचे अपहरण करून त्याचा खून करणाऱ्या खाजगी फायनान्स प्रकरणाचे धागेद्वारे आता थेट नवा मोंढा येथील कुबेरफल या नागरी सहकारी पतसंस्थेपर्यंत पोहोचले आहेत. वजीराबाद पोलिसांनी रविवारी या पतसंस्थेच्या कार्यालयात छापा मारला. या छापेमारीत काही कागदपत्र आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे आता या खून प्रकरणात ‘कुबेरफल’चा नेमका किती आणि कसा सहभाग आहे याकडे लक्ष लागले आहे.
शनिवारी दुपारी नांदेड शहरातील हिंगोली गेट भागात केएफ या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळला होता. शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या पत्नी ज्योती शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी शिंदे यांना माळकौठा येथून उचलून आणणाऱ्या केएफ फायनान्सच्या तिघाविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. शिंदे यांना जयकुमार उर्फ शेरा भगवान गायकवाड रा.गोपाळचावडी, शेख आमिर शेख साहेब हुसेन रा. मलंग बाबा बिल्डिंगजवळ खुदगई नगर देगलूर नाका आणि इमरान खान शहाबाज खान रा. बुऱ्हान मशीदजवळ गोवर्धनघाट या तिघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून केएफ इंटरप्राईजेस या फायनान्सच्या कार्यालयात आणले. तेथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचवेळी आरोपींच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेची सहा आणि इतर सहा अशी बारा पथके रवाना झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या शेतकरी खून प्रकरणात खालसा फायनान्स असा शनिवारी उल्लेख केला जात होता; मात्र या प्रकरणातील खाजगी फायनान्स हे खालसा फायनान्स नसून कुबेरफल इंटरप्राईजेस असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तपासात आता वजीराबाद पोलिसांनी रविवारी दुपारी नवा मोंढा येथील कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयावर छापा मारत महत्वाची कागदपत्र जप्त केली आहेत. त्यामुळे या कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्थेचे नेमके संचालक कोण आहेत? या पतसंस्थेचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याबाबतचा तपास पोलिसांकडून केला आहे. त्यादृष्टीने पोलीस आता तपासाच्या कामात गुंतले आहेत.
माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनीही शेतकरी खून प्रकरणात पोलीस योग्य दिशेने तपास करत असल्याचे सांगितले. आतापर्यंत तिघांना अटक केली असल्याची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले. अवैध सावकारी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करणे निश्चितपणे गरजेचे आहे. त्याचवेळी परवानाधारक सावकारांवरही शासन स्तरावरून वसुलीसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणात आता प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
पोलीस प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार..! जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास केला जात आहे. याबाबत डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले, या प्रकरणाच्या तपासात पोलीस मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या तपासात अनेक धागेदोरे असून ते आत्ताच स्पष्टपणे उलगडता येणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. तो तपासाचा एक भाग आहे. शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा शवविच्छेदन अहवालही अद्याप अप्राप्त आहे. त्यामुळे अनेक बाबी अस्पष्ट आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. अनेक ठिकाणी पोलिसाकडून छापेमारी सुरू आहे. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



