
नांदेड – नांदेड शहरातील हिंगोली गेट चिखलवाडी रोडवरील खालसा फायनान्सच्या कार्यालयात मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत शिंदे या ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यात खाजगी फायनान्स चालकांनी दुष्काळी परिस्थितीत फास आवळला असल्याचेच या घटनेने स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना फायनान्स कर्मचाऱ्यांनी गुरुवारी थेट माळकौठा गावातून आठवडी बाजारातून उचलून आणले होते. त्यानंतर त्यांचा आज शनिवारी मृतदेह आढळून आला. शिंदे यांचा फायनान्स चालकाने खून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात आता पोलीस तपास करीत आहेत.
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील ४० वर्षीय चंद्रकांत शिंदे यांनी नांदेडमधील खालसा फायनान्सकडून दहा हजार रुपये घेतले होते. गेल्या महिन्यात दहा हजार रुपयांचे कर्ज काढले, व्याज कापून त्यांना सात हजार रुपये देण्यात आले. चंद्रकांत शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. दुष्काळामुळे शिंदे यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. ते कर्जाचे पैसे भरू शकले नाहीत. कर्जाच्या वसुलीसाठी शिंदे यांना फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी गावातून आठवडी बाजारातून उलचून नांदेडमधील कार्यालयात आणले. शिंदे यांच्याकडे ७० हजार रुपये देण्याची मागणी केली असा नातेवाईकांचा आरोप आहे. गुरुवारी त्यांना गावातून उचलून आणल्यानंतर एक दोन दिवसात फायनान्सवाले त्यांना सोडून देतील, असं कुटुंबियांना वाटलं. मात्र नांदेडमध्ये खालसा फायनान्सच्या कार्यालयात शनिवारी शिंदे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स चालकाने चंद्रकांत शिंदे यांची हत्या केली असा नातेवाईकांचा आरोप आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर खालसा फायनान्स चालक पसार झाला. या प्रकरणात मयत चंद्रकांत शिंदे यांची आई सर्जाबाई शिंदे आणि मुलगी रूपाली चंद्रकांत शिंदे यांनी फायनान्स चालकानेच खून केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी दिली. त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी या प्रकरणात आता शवविच्छेदन अहवाल आणि प्रार्थमिक तपासानंतरच नेमके कारण सांगता येईल असे स्पष्ट केले.
दरम्यान, नांदेड जिल्हाधिकारी यांना ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी यांना खाजगी फायनान्स चालकाकडून वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असल्याबाबत १९ ऑक्टोबर रोजी हदगाव तालुक्यातील येवली येथील महिलांनी निवेदन दिले होते. या खाजगी फायनान्स चालकांवर आळा घालावा अशी मागणी करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या महादेवी मठपती यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसातच हा प्रकार घडला आहे. दुष्काळी परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तातडीने पत्र काढून खाजगी फायनान्स चालकांची वसुली तातडीने थांबविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे.
गुरुवारी भर बाजारातून शिंदे यांना उचलले…
चंद्रकांत शिंदे यांना फायनान्स वाल्यांनी गुरुवारी माळकौठा येथील आठवडी बाजारातून गुरुवारी उचलून नांदेडला आणले. माळकौठा येथील दोन शेतकऱ्यांना यापूर्वी अशाच पद्धतीने उचलून आणून दुसऱ्या दिवशी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे आपल्या वडिलांनाही तसेच सोडून देतील, असे शिंदे यांची मुलगी रूपाली शिंदे तसेच इतर कुटुंबीयांना वाटले. चंद्रकांत शिंदे यांनी फोनद्वारे आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. त्यावेळी येथे आपल्याला त्रास दिला जात असल्याची माहिती त्यांनी आपली आई सर्जाबाई शिंदे यांना दिली होती. त्यामुळे तातडीने पैशाची व्यवस्था करावी अशी विनवणीही त्यांनी आईकडे केली होती; मात्र अशा दुष्काळी परिस्थितीत पैसा आणायचा कुठून असे आईने सांगितले. त्यानंतर आपला मुलगा चंद्रकांतच्या मृत्यूची बातमी आली असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा आता पोलिसांना सखोल छडा लावावा लागणार आहे. नांदेडमधील या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ. रोहित पवार यांनीही या प्रकरणात आला संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



