
नांदेड : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होत असल्याच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत दगडोजी शिंदे यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर संबंधित यंत्रणांना सक्तीच्या कर्जवसुलीच्या प्रकारांवर लक्ष ठेवून तातडीने कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. त्याचवेळी उद्या रविवारी जिल्ह्यात कार्यरत सर्व मायक्रो व स्मॉल फायनान्स संस्थांच्या जिल्हास्तरीय प्रमुखांची सकाळी ११ वाजता तातडीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूची घटना, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच जाचक कर्जवसुलीबाबत प्राप्त तक्रारी आणि समाजमाध्यमांवरील वृत्तांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कार्यरत सर्व मायक्रो व स्मॉल फायनान्स संस्थांच्या जिल्हास्तरीय प्रमुखांची २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तातडीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस संबंधित संस्थांच्या प्रमुखांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, यासाठी तातडीने अधिकृत सूचना निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. बैठकीपूर्वी संबंधित यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांना धीर देत टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करताना संवेदनशीलता राखणे आवश्यक आहे. खासगी वित्तीय संस्था, मायक्रो फायनान्स आणि स्मॉल फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर कर्जफेडीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहकारी संस्थांचे उपनिबंधक आणि तालुका कृषी अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांकडून खासगी वित्तीय संस्था किंवा बँकांमार्फत सक्तीने कर्जवसुली होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध तातडीने कायदेशीर कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरित सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तर वाचला असता चंद्रकांत शिंदे यांचा जीव…खासगी वित्तीय संस्था, मायक्रो फायनान्स आणि स्मॉल फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर कर्जफेडीसाठी तगादा लावला जात असल्याची तक्रार १९ ऑक्टोबर रोजी हदगाव तालुक्यातील येवली येथील महिलांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती. मायक्रो फायनान्सचे कर्मचारी दिवसभर घरामध्ये वसुलीसाठी बसत असल्याचा गंभीर प्रकारही यावेळी प्रशासनापुढे मांडला होता. ही तक्रार गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही केली असती तर कदाचित शिंदे यांच्यावरील हा जीवघेणा प्रसंग टळला असता असेही सांगितले जात आहे; मात्र येवली येथील महिलांच्या या निवेदनाची वेळीच दखल घेतली नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या महादेवी मठपती यांनी व्यक्त केली.
तर वाचला असता चंद्रकांत शिंदे यांचा जीव…


