ऐतिहासिक

छत्रपतींच्या जयघोषात नांदेडमध्ये ‘शिवगर्जना’  

आज आणि उद्याही होणार महानाट्याचे प्रयोग, उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आवाहन

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचा ९ मार्च रोजी नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर छत्रपतींच्या जयघोषात थाटात प्रारंभ झाला. २५० पेक्षा अधिक कलाकारांचे सादरीकरण आणि हजारो रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद अशी तीन तासांचे महानाट्य मैदानावर रंगले.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य शिवगर्जनाचा प्रयोग होत आहे.

शनिवारी पहिल्या दिवशी आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार , जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी सायंकाळी ७ वाजता या महानाटयाची सुरुवात केली.

छत्रपती शिवाजी महाराजाच्या उदयापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, परकीय आक्रमणात पोळलेला महाराष्ट्र आणि छत्रपतीचा उदय होत असतानाची परिस्थिती. त्याकाळातील संस्कृती,  लोकनाटय, लोककला याची गुंफण करीत पुढे छत्रपतीच्या आयुष्यातील चित्तथरारक प्रसंगाचे लक्षवेधी सादरीकरण,ओघवते निवेदन, ध्वनी व प्रकाश व्यवस्था यामुळे  रसिक मंत्रमुग्ध झाले. शिवाजी महाराजाची थेट घोडयावरून मावळ्यासह मैदानावरची लाईव्ह रपेट, घोड्यावरची चार मजली सेटवरची हदयाचा ठोका चुकवणारी एन्ट्री, युद्धाचे प्रसंग चित्तथरराक होते. सलग तीन तास कोणताही मध्यांतर न घेता हा प्रयोग सुरू होता. प्रत्येक कुटुंबाने बघावा असा हा नाट्यप्रयोग  रविवारी व सोमवारी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महानाट्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

https://youtu.be/VqZADw3thdI?si=Wt10Lhw0T4TbN80L

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!