
नांदेड – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची घोषणा केली आहे. त्यालाच जोडून माझा विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड हा संकल्प आहे. माझ्याकडे नांदेडच्या विकासाचा रोडमॅप तयार असून निवडणुकीची धामधूम संपतात जिल्ह्यात विकास कामे सुरू करण्यात येतील, असे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर ते बोलत होते.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि खासदार म्हणून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर खा. चव्हाण हे २३ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये दाखल झाले. श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावरून शिवाजी नगरातील ‘आनंद निलयम’ या निवासस्थानापर्यंत त्यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. या स्वागतामध्ये भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तब्बल तीन तास ही स्वागत मिरवणूक नांदेड शहरातून निघाली होती. चव्हाण हे निवासस्थानी दाखल होताच त्यांचे वेद मंत्रोच्चारात स्वागत करण्यात आले. यासाठी ॲड. महेश कनकदंडे यांच्या नेतृत्वात जवळपास दीडशे ब्रह्मवृंद या विधीसाठी उपस्थित होते.
प्रारंभी चव्हाण यांचे भाजप पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक आणि भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड व भोकर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपात प्रवेश केलेले अमरनाथ राजूरकर यांनी केला यावेळी राजूरकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा सर्वत्र फडकला जाईल असा विश्वास व्यक्त केला भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांनीही अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात आता मराठवाडा विकासात पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी आता चव्हाण यांनी भाजपा कार्यकर्त्यांचाही विकास करावा अशी अपेक्षा केली. ही अपेक्षा व्यक्त करताना चव्हाण हे परिस असून त्यांचा स्पर्श होताच अनेकांचे सोने होते असा उल्लेख केला. राम पाटील रातोळीकर यांनी चव्हाण हे व्हिजन असलेले नेतृत्व असल्याचे सांगितले. मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनीही या कार्यक्रमात अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व मान्य करून आम्ही आगामी काळात काम करू अशी ग्वाही दिली.या स्वागत कार्यक्रमात बोलताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले की आता माझी जबाबदारी वाढली आहे. १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर तीन दिवसातच भाजपाने आपल्याला राज्यसभेची उमेदवारी दिली. इतकेच नव्हे तर ही निवडणूक बिनविरोध झाली याचाही मोठा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची घोषणा केली आहे. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड ही भावना घेऊन आपण काम करणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले. नांदेडची विकासाची भूक पूर्ण झाली पाहिजे असेही ते म्हणाले. ज्या ज्या वेळी मी पदावर होतो त्यावेळी नांदेडला नेहमीच झुकते माप दिले आहे. आगामी पाच वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण साले यांनी केलं तर आभार नांदेड कृषी उत्पन्न समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर यांनी मानले. या सत्कार कार्यक्रमास माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भाजपाचे देविदास राठोड, माजी आमदार अविनाश घाटे, मीनल खतगावकर, किशोर स्वामी, संजय मोरे, उमेश पवळे, विजय येवनकर, दिलीपसिंघ सोडी, प्रा. बालाजी गिरगावकर, मारुती शंकतीर्थकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील लोक आपली वाट पाहत असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. त्या सर्वांना आपण भेटणार आहोत. यासाठी नांदेडमध्ये आगामी चार ते पाच दिवस आहोत असेही ते म्हणाले. जिल्ह्यात भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी संपूर्ण भाजपा पदाधिकारी आणि काँग्रेसमधील जुने पदाधिकारी मिळून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना भाजपात प्रवेश घेण्यासाठी कोणताही दबाव राहणार नाही. जे येतील त्यांचे मात्र निश्चितपणे स्वागत केले जाईल. लवकरच भाजपातील प्रमुख कार्यकर्त्यांची आपण बैठक घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितलं तर उद्या शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल असेही ते म्हणाले. एकूणच नांदेड जिल्ह्यात भाजपाचे सर्व सूत्र आता खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या हाती घेतले असल्याचे स्पष्ट झाले आहे.