Uncategorized

धर्माच्या नावावर गैरसमज पसरवणाऱ्या ५ नेटकऱ्यांवर नांदेडमध्ये गुन्हे दाखल 

फेसबुक, इन्स्टाग्रामवरील समाजकटंकांची झाडाझडती

नांदेड : ऐन निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्या जिल्ह्यातील असामाजिक तत्वांच्या पाच जणांविरुद्ध नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. धार्मिक आणि जातीय विषयांवरून लोकांची माथी भडकवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्ह्याच्या पाच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निवडणुकीमध्ये जात, धर्म, पंथ याचा वापर करू नये, अशी आदर्श आचारसंहिता आहे. मात्र ऐन निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने काही पोस्ट तयार करणाऱ्या पाच जणांना सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने शोधले आहे. माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीच्या अंतर्गत ही समिती कार्यरत कार्यरत आहे.

धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्यावर हिमायतनगर अंतर्गत २९५ ( अ ), मुखेडमध्ये ५०५ ( २ ), अर्धापूर मध्ये ५०५ ( २ ) व ५०६ ( दोन आरोपी ) माहूर ५०५ (२ ) असे दाखल केलेल्या कलमांचा तपशील आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे नाव जाहीर केलेले नाहीत. निवडणुका लागल्यापासून पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

तथापि, तरुणांनी निवडणूक काळामध्ये जाती धर्माच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही पोस्ट एकमेकांना फॉरवर्ड करू नये. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर आल्यानंतर एकमेकांची डोकी गरम करण्यापेक्षा व अफवा पसरविण्यापेक्षा थेट माहिती नांदेड पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

शहरात सण, उत्सवाचा व निवडणुकीचा काळ असताना काही समाजकंटक हेतूपुरस्सर अशा पोस्ट टाकतात. काही पोस्ट या जुन्या असतात, तर काही कुठल्या अन्य राज्यातील असतात. त्यामुळे अशा कुठल्याही पोस्टमुळे तणाव निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी जागृत असावे. आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवावे. कोणत्याही पोस्टवर मत बनवू नये. तसेच विचलित होऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

 

तात्काळ तक्रार करावी…             आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास समाजमाध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने ८३०८२७४१०० हा नंबर दिला आहे. सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी करत असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!