
नांदेड – महापालिकेचे उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांना आज महाराष्ट्र दिनी ‘ऑफीसर ऑफ द मन्थ’ या पुरस्काराने आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचे हस्ते मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट आणि नियोजनबध्दरित्या महापालिकेच्या हिताचे काम केल्याबद्दल संधू यांचा हा गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकाच वर्षात दोन वेळा त्यांना ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
उपायुक्त स.अजितपासिंघ संधू यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या मौजे असदुल्लाबाद येथील सर्व्हे नं. ६० मधील जागेवर मागील १० ते १५ वर्षापासून अतिक्रमण करून बसलेल्यांचे अतिक्रमण काढून जागा रिकामी करुन, महानगरपालिकेच्या ताब्यात घेतली आहे. महानरगपालिका मालकीची मौजे असदुल्लाबाद सर्व्हे नं.१ मधील जागेवर अतिक्रमण करत कब्जा केला होता. सदरील अतिक्रमण व कब्जा काढून, सदरील जागेवर महानगरपालिका मालकी जागेचा फलक लावुन जागेस तारेचे कुंपन करण्यात आले आहे. नांदेड-हिंगोली रोडवरील महानगरपालिका मालकीच्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले होते. सदरील अतिक्रमण काढून जागा रिकामी करून ताब्यात घेतली आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गुरुव्दारा परिसरामध्ये फुटपाथवर झालेले अतिक्रमण काढण्याची धाडसी कारवाई स. अजितपालसिंघ संधु यांनी केलेली आहे. महानगरपालिका मालकीचे जलाशुध्दीकरण केंद्र काबरानगर येथील व्यापारी संकुलनातील गाळे ई-लिलाव पध्दतीने भाडेपट्टीवर देण्याची यशस्वी कार्यवाही पार पाडल्यामुळे महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.
एकूणच या व इतर कार्यालयीन कामगिरीबद्दल उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांचा महापालिका आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी सन्मान केला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मुख्य लेखापरीक्षक तु.ल.भिसे, उपआयुक्त कारभारी दिवेकर, मुख्य लेखाधिकारी जनार्दन पकवाने, सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘ऑफिसर ऑफ द मंथ” हा पुरस्कार एकाच वर्षात दुसऱ्यांदा पटकावणारे संधू हे आता ‘ऑफिसर ऑफ द इयर’ या पुरस्काराचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे जाहिरात धोरणं अंत्यत योग्य पद्धतीने निश्चित केल्यामुळे जुलै २०२३ मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.