
नांदेड – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कंधार लोहा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाजपा प्रवेशाबद्दल सुरू असलेल्या चर्चाचे स्पष्टपणे खंडन करताना या चर्चा कोण घडवून आणत आहे याचा शोध घ्यावा असे सांगितले. कोणाला काय वाटत आहे यापेक्षा आपल्याला राष्ट्रवादी सोडावी वाटत नाही हे नक्की असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आपला प्रवेशाबद्दल चर्चा होते, ती का करण्यात आली हे त्यांनाच विचारावे असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून समाज माध्यम तसेच वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे. या चर्चांना पूर्णविराम देताना सोमवारी आमदार चिखलीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पूर्णतः निराधार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या बैठक कोअर कमिटीच्या बैठकीत आपल्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ती चर्चा झाली की नाही ही बाब संबंधितांना विचारावी, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला प्रवेश हा वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरूनच झाला. वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वामध्ये झालेल्या ॲडजस्टमेंटमुळे मला राष्ट्रवादीत जावे लागले मी राष्ट्रवादीत गेलो आणि कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालो. आजही मी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. मी ज्या पक्षात गेलो तिथे प्रामाणिकपणे काम केले आहे, तो पक्ष वाढविला आहे. दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी जितके प्रेम आपल्याला दिले तितकेच प्रेम आजही आपल्याला राष्ट्रवादीत मिळत आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षात आजही आपले मित्र आहेत. एखाद्या मित्राच्या घरी जाणे यात गैर काय हा प्रश्नही त्यांनी विचारला. आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा घडवून का आणल्या जात आहेत हा प्रश्न माध्यमांनी ज्यांनी चर्चा घडवून आणल्या त्यांना विचारावा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असावा मात्र त्यांनी केलेले हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असेही चिखलीकर म्हणाले. यावेळी माजी आमदार अविनाश घाटे, मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादीचे शहर महानगराध्यक्ष माधव पावडे, वसंत सुगावे आदींची यावेळी उपस्थिती होती.
जर मला जायचं असेल तर कोणीच अडवू शकणार नाही..!भारतीय जनता पक्षात येण्यासाठी आपणास कोणी ऑफर दिली आहे? का असा प्रश्न विचारला असता मला ऑफर देणारे कोण किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. जर मला भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचाच असेल तर मला तिथे कोणीही म्हणजे कोणीही अडवू शकत नाही असेही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले.



