
नांदेड – नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांना मानसन्मान दिला जात नाही. त्याचवेळी निधी वाटपातही दुजाभाव केला जात असल्याचा थेट आरोप शिवसेना शिंदे गटाचे नांदेड शहर प्रमुख तूलजेश यादव यांनी केला आहे. या संदर्भाने जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना आज रविवारी नांदेडमध्ये निवेदन देण्यात आले. नांदेडचा पालकमंत्री शिवसेनेचा असावा अशी थेट मागणीही करण्यात आली आहे. याबाबत नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर यांची प्रतिक्रिया घेतली असता या संदर्भात माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असे ते म्हणाले.
निधी वाटप आणि सन्मानावरून नांदेडमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात ठिणगी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच कारणावरून आज रविवारी नांदेड दौऱ्यावर असलेले शिवसेना शिंदे गटाचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन शिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी नांदेडचे भाजप पालकमंत्री अतुल सावे यांना बदलून शिवसेनेचा पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. भाजपाचे पालकमंत्री अतुल सावे हे शिवसेना पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, शिवसेनेने मागणी केलेल्या कामाकडे लक्ष देत नाहीत, विकासनिधी वाटपात शिवसेनेला योग्य वाटा दिला जात नाही, असा आरोप तुलजेश यादव यांनी केला आहे.
शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीचा घटक म्हणून शासनाच्या विविध विकास कामांमध्ये सक्रियपणे काम करीत असताना त्यांचा अपेक्षित सन्मान आणि आवश्यक ते सहकार्य त्यांना मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील विविध विकासकामांसाठी केलेल्या मागण्यांनाही पालकमंत्री सावे यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे जनतेची कामे करण्यात शिवसैनिकांना अडचणी येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आजपर्यंत शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील आवश्यक कामासाठी निधीची मागणी केली; मात्र त्यांना निधी देण्यात आला नाही. नुकत्याच झालेल्या विशेष कार्यकारी अधिकारी या सारख्या नियुक्तांमध्येही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विचार करण्यात आला नाही. त्यांना डावलण्यात आले आहे. पालकमंत्री सावे यांनी शिवसेनेला विरोधकांप्रमाणे वागणूक देत आहेत. पालकमंत्री हे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सत्तेतील सहकारी पक्षाप्रमाणे नव्हे तर विरोधकांप्रमाणे वागत असल्याचेही यादव म्हणाले. या सर्व प्रकारामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधला जात नाही. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. हा समन्वय निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जावा अशी मागणीही करण्यात आली आहे. पालकमंत्री सावे यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनाच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे; मात्र पक्षीय कारणामुळे अनेकजण आपली भूमिका उघडपणे मांडत नसल्याची परिस्थिती आहे.
विकास कामावर १५ ते २९ टक्के कमिशन..! नांदेड जिल्ह्यातील विकास कामांच्या निधी वाटपामध्ये १५ ते २० टक्के कमिशन घेतले जात असल्याचा गंभीर आरोप पदाधिकारी आणि नागरिकांकडून केला जात आहे. या आरोपाची सत्यता तपासण्यासाठी शासनाने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. आरोप खरे आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, गेल्या दोन वर्षातील विकासनिधी वाटपाची तपासणी व आवश्यक असल्यास विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागण्याही यावेळी तुलजेश यादव यांच्याकडून करण्यात आली.



