
नांदेड – नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा होत असल्याची बाब शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नांदेड तहसील कार्यालयाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सायंकाळी दोन-चार तराफे आणि एका पंपाला पकडून ते जाळून टाकले खरे. परंतु पुन्हा काही तासातच विष्णुपुरी प्रकल्पातील अवैध वाळू उपसाची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे आगामी काळात विष्णुपुरी प्रकल्पास धोका उद्भवल्यास या बाबीस जबाबदार कोण असाच प्रश्न पुढे आला आहे. रविवारीही सकाळपासूनच हजारो पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरूच होता.
नांदेड जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काळेश्वरस्थित विष्णुपुरी प्रकल्पातून गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. थेट पंपाद्वारेच विष्णुपुरी प्रकल्पातून वाळू उपसा सुरू आहे. येथील वाळू शहरात आणि पर जिल्ह्यातही जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांना कारवाईबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार उपविभागीय माने यांनी तहसील कार्यालयाच्या एका पथकास तातडीने तेथे धाडले. या पथकाने कारवाई करताना दोन-चार तराफे जाळले. तसेच एका पंपालाही उध्वस्त केले. मात्र ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपातच ठरली. काही तासातच पुन्हा एकदा वाळूमाफिया तेथे पूर्ण ताकदीने अवतरले. रविवारी सकाळपासूनच हजारो पंप विष्णुपुरी प्रकल्पात दाखल झाले आणि पुन्हा एकदा नित्यनेमाने तेथे वाळू उपसा सुरू झाला. तराफ्याच्या सहाय्याने पंपाच्या सहाय्याने उपसलेली वाळू काठावर आणून ते टिप्परच्या सहाय्याने शहरात आणली जात आहे. तसेच हायवाच्या माध्यमातून परजिल्ह्यातही जात आहे. यातून कोट्यावधी रुपयांची माया एकत्रित केली जात आहे. ही माया ठेकेदारांसह अधिकाऱ्यांच्याही घशात घातली जात असल्याचीच परिस्थिती आहे.
रात्रंदिवस होत असलेल्या वाळू उपसा यावर आता महसूल प्रशासन आळा घालण्यास असमर्थच ठरल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी नांदेडकरांना विष्णुपुरी प्रकल्पातून होत असलेला हा अवैध वाळू उपसा पहावा लागणार आहे. आगामी काळात विष्णुपुरी प्रकल्पातील जलसाठा तसेच प्रकल्पालाही काही धोका उद्भवल्यास मोठे संकट नांदेडकरांना सहन करावे लागणार आहे. हे रोखण्यासाठी आता पर्यावरण प्रेमी नांदेडकरांनाच आता एकत्रित यावे लागणार आहे. एकीकडे विष्णुपुरी प्रकल्पाच्या अलीकडील भागात जलपर्णीने आपले साम्राज्य पसरविले आहे. याबाबत नांदेडकर चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसऱ्या बाजूने अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नांदेड शहरात नेमके राज कोणाचे हाच प्रश्न आहे. प्रशासन केवळ नावालाच आहे का असा प्रश्नही पर्यावरण प्रेमी विचारत आहेत.