नांदेड – हडको येथील रहिवासी असलेले बीएसएफ जवान तथा नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम (वय ४२) यांना ८ जुलै रोजी हरियाणात कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या या वीरमरणामुळे संपूर्ण सिडको – हडकोत शोककळा पसरली आहे.
हडको येथील रहिवासी कामेश कदम हे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये १६ जुलै २००३ रोजी रुजू झाले होते. आपल्या कर्तव्यकाळात नाईक पदावर पोहोचले होते. कामेश कदम यांनी आपल्या सीमा सुरक्षा दलातील आपल्या कर्तव्य कार्यकाळात दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, बांगलादेश बॉर्डर येथे सेवा बजावली होती. सध्या ते हरियाणा येथे कार्यरत होते.
कामेश कदम ९ जुलै रोजी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कामेश कदम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. शहीद कामेश कदम यांचे पार्थिव देह बुधवारी रात्री उशिरा हडको येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचेल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. गुरुवारी त्यांच्या पार्थीव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांचे ते बंधू होत.