
नांदेड – आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित प्रदीप मिश्रा यांची नांदेडमधील शिवमहापुराण कथा आता भक्तांना पावसाने झालेल्या गैरसोयीमुळे सभामंडपात बसून ऐकता येणार नाही. आगामी दोन ते तीन दिवस ही कथा आता ऑनलाईन स्वरूपात भाविकांना ऐकण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच संयोजकांनी दिली आहे. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने हा बदल करण्यात आला असून भाविकांनी कथास्थळी न पोहोचता घरूनच या शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेडमध्ये २३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान कौठा येथील मोदी ग्राऊंडवर पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. पहिला दिवस शुक्रवारी उत्साहात पार पडला. मात्र संध्याकाळी सुरू झालेल्या जोरदार पावसाने सभामंडपात पाणीच पाणी झाले. मुक्कामी थांबलेल्या हजारो भाविकांची या पावसाने तारांबळ उडाली. मात्र वेळीच पोहोचलेल्या प्रशासकीय यंत्रणेने या सर्व भाविकांना मदतीचा हात देत भाविकांच्या राहण्याची, जेवण्याची सोय केली.
शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने सभामंडपात पाणीच पाणी झाले आहे. त्याचवेळी आगामी दोन ते तीन दिवस हवामान विभागाने मोठ्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर दोन ते तीन दिवस पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा भाविकांसाठी ऑनलाईन पद्धतीने ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. आस्था टीव्ही तसेच इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही कथा प्रत्यक्ष ऐकता येणार आहे. त्यामुळे भाविकांनी कथेसाठी सभामंडपात न येता ऑनलाईन पद्धतीने घरूनच कथा श्रवण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आयोजक डॉ. शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांनी केले आहे.