प्रशासकीय

सावधान..! ईव्हीएम मशीन फोडणे, मतदान करताना व्हिडिओ काढणे पडणार महागात

एप्रिल २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील २३ गुन्हे न्यायप्रविष्ट, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

नांदेड :- लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीदरम्यान समाज माध्यमांवर आचारसंहिता भंग होईल अशा पोस्ट करणे महागात पडणार आहे. कारण समाज माध्यमांवरील पोस्ट हा सबळ पुरावा मानल्या जातो. तसेच आचारसंहिता भंग करण्याचे गुन्हे कोणीही गृहित धरू नयेत. या प्रकरणात शंभर टक्के शिक्षा भोगावी लागते. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अशा स्वरुपाचे २३ गुन्हे न्यायप्रविष्ट असून या सर्व गुन्ह्यांच्या संदर्भातील आढावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी घेतला.

या दोन्ही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशेषत: जिल्ह्यातील तरुणांना आवाहन करताना सोशल मिडियाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. आपले मतदान हेच आपले व्यवस्थेबद्दलचे उत्तम मत आहे. त्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. तथापि अनावधानाने देखील समाज माध्यमांवर आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. समाज माध्यमांवरील चुकीची पोस्ट हा प्रबळ पुरावा ठरतो. त्यामुळे नागरिकांनी अतिशय सावधतेने समाज माध्यमांवर व्यक्त व्हावे, असे आवाहनही जिल्हा व पोलीस प्रशासनाने केले आहे. यावेळी सर्व न्यायप्रविष्ट प्रकरणावर विचार विनिमय करण्यात आला. निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीमध्ये अनेक कायदे बनविले आहेत. कोणतेही बॅनर त्याखाली आकार, प्रकाशक, मुद्रक याशिवाय न लावण्याचे सूचविले आहे. परवानगी शिवाय उमेदवारांच्या जाहिरातीवर निर्बंध आहेत. सोशल माध्यमांचा गैरवापर करणे, चुकीच्या पोस्ट टाकणे, जातीवाचक धर्मवादी पोस्ट करणे, निवडणूक साहित्याशी छेडछाड करणे, निवडणूक यंत्रणेला गृहित धरणे, मंदिर, मशिद व अन्य धार्मिक स्थळांमध्ये सभा, संमेलन घेणे, कोणाच्याही भिंतीवर काहीही चिटकविणे, लावणे मनाई आहे. निवडणूक काळामध्ये परवानगी शिवाय काही करता येत नाही. याशिवाय मतदान करतांना व्हिडिओ बनविणे, सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आचारसंहितेचा भंग ठरतो.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये २९ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. पंचायत समिती नायगाव येथील एका शासकीय कर्मचाऱ्याने व्हिडिओ बनवून व्हायरला केला होता. दुसरा गुन्हा याच तारखेमध्ये सकनूर आरोपीने बॅनरवर आकार, प्रकाशक, मुद्रक यांचे नाव लिहिणे आवश्यक असतांना तसे न केल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला होता. लोकसेवक असतांना एका पक्षाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. विनापरवाना पक्षाचे झेंडे लावणे, गाडीवर नेत्यांचे फोटो लावणे, उमेदवारांचे फोटो लावणे याबाबतही गुन्हे दाखल झाले आहेत.आचारसंहिता काळामध्ये एकाने डीजे लावून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले होते. शासकीय कर्मचाऱ्यांने देखील या काळात दिलेले कामे वेळेत करणे आवश्यक असते. दुर्लक्ष केल्यामुळे काही गुन्हे गेल्यावेळी दाखल झाले आहेत. सभा संपल्यानंतर पक्षाचे झेंडे न काढणे आयोजकाच्या अंगावर आले होते. या प्रकरणातही गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक कार्याचे आदेश असतांना शासकीय कर्मचाऱ्यानी प्रचाराच्या कामात राहू नये. अशा पद्धतीने प्रचार करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर गेल्या लोकसभेत गुन्हा दाखल झाला आहे. मतदान करतांना मोबाईलवर शुटिंग करण्यास प्रतिबंध आहे. मात्र मतदान करतांनाचे शुटींग कर्मचाऱ्याच्या लपून करणे गेल्या निवडणुकीत महाग पडले आहे. यासाठी दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

याशिवाय गेल्या निवडणुकीत काही पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेलकडून निवडणुकी संदर्भात चुकीच्या पोस्ट आल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजाची भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल केल्याबद्दल, मुखेड येथे इन्स्टाग्रामवर हिंदू समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल केल्याबद्दल. अर्धापूर येथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल केल्याबद्दल. माहूरमध्ये इन्स्टाग्रामवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट केल्याबद्दल. अर्धापूर येथे एका  समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल. शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत इन्स्ट्राग्रामवर मुस्लिम समाजाची भावना दुखविणारी पोस्ट केल्याबद्दल तर लोहा पोलीस स्टेशन अंतर्गत मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट फोटो घेऊन फेसबुकवर प्रसारीत केल्याबद्दल गेल्या लोकसभा निवडणुकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट असून याप्रकरणात लवकरच कायदेशीर कारवाई होईल, असे सुतोवाच त्यांनी केले आहे.

रामतीर्थ येथील एका घटनेत व्हीव्हीपॅट व दोन बीयू मशीन तोडफोड केल्याचा शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा तसेच पोलिसांशी धक्काबुकी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल आहे. हदगाव येथे मतदान करत असताना मतदान यंत्रावरील बॅलेट युनिट दिसत असणारा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात चार्जसिट दाखल झाली असून हे प्रकरण देखील न्याय प्रविष्ट आहे. कोणालाही प्रचारासाठी प्रतिबंध करणे. गावात आलेल्या वाहनाला अडवणे, बॅनर फाडणे. धोकादायक असून अशा पद्धतीचे कार्य करणाऱ्या व्यक्तीवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे अशा पद्धतीच्या कृत्यात कोणी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!