
नांदेड – नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे व नायगाव पोलीस ठाण्याच्या सीमेवर चालणाऱ्या जुगार अड्डयावर शनिवारी सायंकाळी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. पंचवटी हॉटेलच्या पाठीमागे शिवारात एका शेतातील शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असलेल्या एकूण १३ जणांना पकडले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत कारवाया केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. अवैध धंदे रोखण्यासाठी सहा विशेष पथकांची ही स्थापना करण्यात आली आहे. मात्र गेल्या महिनाभरात या विशेष पथकाकडून एकही मोठी कारवाई झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. अशातच ऐन दिवाळीत नायगाव तालुक्यातील नायगाव आणि कुंटूर पोलीस ठाण्याच्या सीमेवर एका शेताच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळाली यांच्या पथकाने येथे टाकून १३ जणांना पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम मोठ्या प्रमाणात आढळली आहे. त्याचवेळी मोबाईल, वाहनेही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सदर घटनास्थळ नेमके कोणत्या ठाणे हद्दीत आहे याबाबत शोध घेतला जात होता. रात्री उशिरापर्यंत हा शोध सुरूच होता. हद्दीच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यासाठी होत असलेला विलंब लक्षात घेऊन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनीच थेट कुंटूर पोलीस ठाणे गाठले. थेट कुंटूर पोलीस ठाण्यात उप महानिरीक्षक पोहोचल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. उमाप यांनी कुंटूर ठाण्यात जवळपास दोन तासाहून अधिक काळ तळ ठोकला होता.
सदरील ठिकाणावर ठिकाणावर गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू होता. अनेक गावचे जुगारी या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी येत होते लाखोंची उलाढाल या अड्ड्यावर होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र या जुगार अड्डयाची ना कुंटूर ठाण्याला मिळाली ना नायगाव पोलीस ठाण्याला मिळाली. त्याच वेळी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखाही या जुगार अड्डयाबाबत अनभिज्ञच होती, हेही नवलच. सर्व ठाणे आणि विभागांना चकमा देत सुरू असलेल्या या अड्ड्याबाबत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाला माहिती मिळाली. शनिवारी येथे धाड टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा पोलिसांच्या कामगिरीबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. उपाम यांच्या पथकाला अड्ड्याची माहिती मिळते मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना काहीच माहिती नाही, याचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
एकीकडे अवैध धंदे रोखण्यासाठी विविध मोहिमा सुरू करायच्या मात्र ठाण्यालागतच सुरू असलेल्या अवैध धंद्यांना पाठबळ द्यायचे असे प्रकार आता जिल्ह्यातील अनेक ठाणे हद्दीत घडत आहेत. त्यामुळे खुद्द पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनाच आता कुंटूर ठाण्यात पोहोचावे लागले. यातून जिल्हा पोलिसांचे जिल्ह्यातील अवैध धंदे रोखल्याबाबतचे दावे किती फोल ठरले आहेत हे स्पष्ट होत आहे. विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केल्यानंतरही या जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी घटनास्थळ कोणत्या हद्दीत येते, यावरून स्थानिक पोलीस भांडत राहिले तर त्यामुळे उमापांनीच थेट कुंटूर ठाणे गाठले. एकीकडे जिल्हा पोलीस दल दिवाळीच्या चहापानात गुंतलेले असताना नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षकांची ही कारवाई जिल्हा पोलीस दलाला मोठी चपराक मानली जात आहे.