क्राईम

नांदेड जिल्ह्यात वाळू माफिया थांबेनात..! आता डीआयजींचे पथक आले मैदानात

नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत उमापांच्या पथकाने केली कारवाई; दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त 

नांदेड – वारंवार कारवाया करूनही नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील अवैध वाळू उपसा थांबण्याचे नाव घेत नसल्याची बाब आणखी एकदा स्पष्ट झाली आहे. खुद्द पोलीस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करूनही नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत मार्कंड शिवारात अवैध वाळू उपसा सुरूच असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे आता नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनाच तिसरा डोळा उघडावा लागला आहे. उमापांच्या विशेष पथकाने गुरुवारी मार्कंड येथे कारवाई करत तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध धंदे आणि वाळूमाफीयांच्या या मुजोरीवर  माजी मुख्यमंत्री आणि खा. अशोकराव चव्हाण यांनीही बोट ठेवले आहे. वाळू माफियांची ही मुजोरी मोडून काढावी असे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनीही डीपीसी बैठकीत दिले आहेत. मोठ्या प्रमाणात हायवाच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरून अवैध वाळूची वाहतूक जिल्ह्यात आणि जिल्हा बाहेरही केली जात आहे. यावर स्थानिक पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई करून पुन्हा त्यांना रान मोकळे करून दिले जाते हे जगजाहीर आहे.

५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेदरम्यान माळाकोळी ते खेडकरवाडी रस्त्यावर एक हायवा अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांच्या विशेष पथकास मिळून आला. सदर हायवामधून पाच ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे आढळले. वाळू आणि हायवा असा २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल माळाकोळी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याप्रकरणी माळाकोळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर वाळू वाहतूक ही नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गोदापात्रातून होत असल्याचे स्पष्ट झाले. उमापांच्या विशेष पथकाने पहाटे दोन वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मार्कंड शिवारातील मार्कंडेश्वर महादेव मंदिराजवळील धक्क्यावर कारवाई केली. यावेळी चार हायवा, एक जेसीबी मशीन, नदीतून वाळू उपसण्याचे एक इंजिन, वाळूने भरलेले ६७ तराफे, दोन मशीन यासह नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली ६० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ८२ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोदावरी नदीपात्रातून इंजिनच्या मदतीने वाळू उपसण्याचे काम रात्रीच्या अंधारात सुरू होते. पहाटे दोन वाजता उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचे विशेष पथक तेथे दाखल होताच इंजिन, तराफे, मशिनरी व हायवावरील लोकांनी काम सोडून तेथून पळ काढला. या ठिकाणावरून जप्त केलेल्या साधन सामग्रीवरून या घाटावरून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा आणि साठवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी महानिरीक्षकांच्या विशेष पथकांनी केलेल्या या दोन्ही कारवायांमध्ये ५ हायवा किंमती १ कोटी ६० लाख रुपये, एक जेसीबी मशीन किंमती २५ लाख, एक वाळू काढण्याचे इंजन, वाळूने भरलेले ६७ तराफे, ६५ ब्रास वाळू, नदीपत्रातून वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मशीन असा एकूण २ कोटी २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ, पोकॉ कामाजी गवळे यांच्या पथकाने केली. या पथकाला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी १० हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर किंवा 91 50 100 100 या खबर हेल्पलाइनवर कळवून अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

उमरी, बिलोलीनंतर आता.. नांदेड ग्रामीण? नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने अवैध धंद्यावर धाडी टाकल्यानंतर संबंधित ठाणे अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. उमरी आणि बिलोली येथे जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर तेथील ठाणे प्रभारीना तात्काळ नियंत्रण कक्षात हलवण्यात आले. ५ फेब्रुवारी रोजी नांदेड ग्रामीण हद्दीतील कारवाई तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आता ग्रामीण ठाणे प्रभारींना जबाबदार धरून त्यांनाही नियंत्रण कक्षात हलविले जाईल का? हा प्रश्नही पुढे आला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण ठाणे हद्दीत यापूर्वी खुद्द पोलीस अधीक्षकांनीही कारवाया केल्या आहेत. त्यानंतरही येथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे हे विशेष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!